राज्यपालांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, अधिकाऱ्यांसह मिलिंद नार्वेकरांची हजेरी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray not attended Governors meet) यांची बैठक नियोजित होती.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव, विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray not attended Governors meet) यांची बैठक नियोजित होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीसाठी राजभवनावर गेले नाहीत. आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीसाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि अन्य विभागाचे प्रधान सचिव यांनी राजभवनावर हजेरी लावली. राजभवनवरील या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित राहिले.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करत आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजभवनवर ही बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील असं सांगण्यात येत होतं. मात्र संध्याकाळी सातच्या सुमारास सुरु झालेल्या या बैठकीसाठी मुख्यमंत्री प्रत्यक्ष राजभवनावर हजर झाले नाहीत. मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी आज सकाळीच फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काल राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील कोरोनास्थितीबाबतची माहिती दिली होती. भाजपने राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाव आंदोलना’ची हाक देत ठाकरे सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करुन, प्रश्न उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं.
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत, मात्र कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था, तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
(CM Uddhav Thackeray not attended Governors meet)
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री विश्वासात घेतात, पण भाजप नेत्यांना फक्त राज्यपाल दिसतात : बाळासाहेब थोरात