Ganesh Visarjan | गर्दी टाळून शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन, मुख्यमंत्र्यांकडून फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी
गिरगाव चौपाटी किंवा इतरत्र जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray Visit artificial lake) म्हणाले.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली. तसेच याचे कौतुकही केले. तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली. (CM Uddhav Thackeray Visit artificial lake)
अशा रितीने फिरत्या स्वरुपातील कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना त्यांच्याकडील गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल. एरव्ही गिरगाव चौपाटी किंवा इतरत्र जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
फिरत्या स्वरूपातील विसर्जन तलाव ही कल्पक संकल्पना आहे. यामुळे सणही उत्साहाने पण नियम पाळून साजरा करणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यानंतर के पूर्व विभाग विलेपार्ले येथील पालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावाची देखील पाहणी केली तसेच सूचना दिल्या.
राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन
यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा आज (23 ऑगस्ट) पार पडणार आहे. मुंबईसह राज्यात शनिवारी गणरायाचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन करण्यात आले. अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांच्या गणपतीचे काल आगमन झाले. त्यानंतर आज दुपारनंतर दीड दिवस पूर्ण झाल्यानंतर गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाईल.
गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचे हे थेट समुद्रात करता येणार नाही. तसेच पालिकेकडून जागोजागी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान भाविकांनी शक्यतो घरातच बादली किंवा ड्रममध्ये मूर्तीचे विसर्जन करावे, अशीही सूचना पालिकेकडून देण्यात आली आहे. (CM Uddhav Thackeray Visit artificial lake)
संबंधित बातम्या :
Ganesh Visarjan | राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन, थेट समुद्रात विसर्जन करण्यास मनाई