बॉलिवूड मुंबईबाहेर नेणं हे खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का; योगींचा मिश्किल सवाल

| Updated on: Dec 02, 2020 | 4:38 PM

ही केवळ एक स्पर्धा आहे. ज्यामध्ये चित्रपटसृष्टीला चांगल्या सुविधा आणि सामाजिक सुरक्षा कशाप्रकारे पुरवता येईल, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. | CM Yogi Adityanath

बॉलिवूड मुंबईबाहेर नेणं हे खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का; योगींचा मिश्किल सवाल
Follow us on

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्री (Bollywood) मुंबईबाहेर नेणं म्हणजे एखाद्याच्या खिशातलं पाकीट मारण्याइतकी सोपी गोष्ट आहे का, असा मिश्किल सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath ) यांनी प्रसारमाध्यमांना विचारला. उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशी फिल्मसिटी उभारण्याचा संकल्प सोडला होता. (CM Yogi Adityanath press conference in Mumbai)

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात नेण्याचा योगी सरकारचा डाव असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. याविषयी योगी आदित्यनाथ यांना विचारणा करण्यात आली. या प्रश्नाला योगी आदित्यनाथ यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. मी काहीही हिसकावून घेण्यासाठी मुंबईत आलेलो नाही. बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेणे हे काय खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ही केवळ एक स्पर्धा आहे. ज्यामध्ये चित्रपटसृष्टीला चांगल्या सुविधा आणि सामाजिक सुरक्षा कशाप्रकारे पुरवता येईल, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आम्हाला मुंबईतील लोकांच्या अनुभवाचा लाभ घ्यायचा आहे. जेणेकरून उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाच्या सुविधा उभारणे शक्य होईल. त्यासाठी मी चित्रपटसृष्टीतील लोकांशी संवाद साधला, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

आम्हाला कोणाचीही गुंतवणूक पळवायची नाही किंवा कोणाच्याही विकासात अडथळा आणायचा नाही. आम्ही काहीही न्यायला आलेलो नाही. आम्हाला उत्तर प्रदेशात स्वतंत्र व्यवस्था उभारायची आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

‘बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काहीही घेऊन जायला आलो नाही’

आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

उत्तर प्रदेशात आम्हाला वर्ल्ड क्लास फिल्मसिटी निर्माण करायची आहे. म्हणून व्यक्तिगतरित्या मी अनेकांना भेटलो. काहींशी सामूहिकपणेही चर्चा केली. फिल्मी दुनियेकडूनही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या:

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका

(CM Yogi Adityanath press conference in Mumbai)