कोस्टल रोडचं काम प्रगतीपथावर, पुढील दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा मानस
मुंबईकरांचा सिग्नलमुक्त प्रवास लवकरच सुरु होईल, असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.(Coastal road Project)
मुंबई : शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे काम आतापर्यंत 40 टक्के पूर्ण झालं आहे. येत्या जुलै 2023 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे मुंबईकरांचा सिग्नलमुक्त प्रवास लवकरच सुरु होईल, असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज कोस्टल रोडच्या कामाची पाहणी करुन याबाबतचा आढावा घेतला आहे. (Coastal road Project 40 percent complete)
कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे मुंबईकरांना प्रवास सोयीचा होणार आहे. कोस्टल रोडच्या या प्रकल्पामुळे प्रवासाची वेळ वाचेल. सध्याच्या रस्त्यांवरील रहदारी कमी होईल. तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल. यामुळे इंधनात 30 टक्के बचत होईल.
त्यामुळे समर्पित बीआरटीएसद्वारे सार्वजनिक वाहतूक सुधारणार आहे. या प्रकल्पामुळे 70 हेक्टर इतका हरित पट्टा निर्माण होईल. अमरसन गार्डन 4, हाजीअली 8 आणि वरळीत ६ इंटरचेंजेस म्हणजे वळण मार्ग असणार आहेत. तसंच या तिन्ही ठिकाणी मिळून 1800 वाहनांसाठी पार्किंग असेल. मरीन ड्राईव्हसारखाच लूक असलेला प्रियदर्शिनी ते वरळी असा 7.7 किमी लांब आणि 20 मीटर रूंदीचा समुद्रकिनारी पदपाथ मिळणार आहे.
Yesterday, while on our monthly Coastal Road visit to check on its progress, iron out any hurdles and interact with the work force to thank them for their commitment, I had the opportunity to walk right upto TBM Mavala launched in January 2021 by CM Uddhav Thackeray ji. pic.twitter.com/FeqkIxHOBa
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 13, 2021
उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ
कोस्टल रोडचा प्रकल्प 10.58 किलोमीटर लांबीचा आहे. मरीन ड्राईव्हवरील प्रिन्सेस स्ट्रिट पूल ते वरळीपर्यंत असणार आहे. या कोस्टल रोडमध्ये २.०७ किमीचे प्रत्येकी तीन लेनचे दोन समांतर बोगदे आहेत. या बोगदा खोदकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला होता.
या रोडचा काही भाग खोदण्यासाठी 12.2 मीटर व्यासाचे भारतातील सर्वात मोठे टनेल बोरींग मशीन वापरले जातं आहे. या टीबीएमचे नाव मावळा असून ते चीनमधून आणण्यात आले आहे. त्याचे वजन 2300 टन इतके आहे. हे दोन्ही बोगदे पूर्ण होण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागेल. दोन्ही बोगद्यांना एकमेकांशी जोडणारे सहा क्रॉस टनेल असतील. रोज ६ ते ८ मीटर टनेलिंग केले जाणार आहे. या मशीनच्या मार्फत आतापर्यंत 100 मीटरहून अधिक खोदकाम पूर्ण झालं आहे. तसेच या प्रकल्पाचे उर्वरित काम लवकर केली जाणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्प काय आहे?
कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जातं.
हा रोड मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड 9.98 किमी लांबीचा असणार आहे. कोस्टल रोडवर 1650 वाहनं पार्किंगची सोय असेल. याच्या बांधकामासाठी 4 दशलक्ष मेट्रिक टनचं मटेरियल लागणार आहे. माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार आहेत. कोस्टल रोडमुळं 26 हजार कोटी रुपयांची 90 हेक्टर जमीन खुली होणार आहे. विशेष म्हणजे पुरामध्येही कोस्टल रोडचा वापर शक्य होणार आहे.
कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?
- साडे सहा किलोमीटरचे बोगदे
- आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज
- सिग्नल फ्री मार्ग
- 34 % इंधन बचत होणार
- 1650 वाहन पार्किंगची सोय
- 4 दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार
- माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार
- 4 वर्षाचा कालावधी
- 90 हेक्टर ओपन जागा, 26 हजार कोटींची जागा उपलब्ध होणार
- पुरामध्ये देखील हा मार्ग वापरता येणार
(Coastal road Project 40 percent complete)
संबंधित बातम्या :
कोस्टल रोडचं काम थांबल्यानं दररोज 10 कोटींचं नुकसान, बीएमसी सर्वोच्च न्यायालयात
स्पेशल रिपोर्ट : उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडला हायकोर्टाचा ब्रेक !