नाग, घोणस, कोब्रा, तुंबलेल्या पाण्यातून साप बाहेर, वसई-विरारमध्ये सुळसुळाट
सततच्या पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा शहरात विषारी साप निघत आहेत. पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी सुखरुप जागा शोधत हे साप सोसायटी आणि आजूबाजूच्या शेतात फिरत आहेत.
ठाणे : सततच्या पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा शहरात विषारी साप निघत आहेत. पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी सुखरुप जागा शोधत हे साप सोसायटी आणि आजूबाजूच्या शेतात फिरत आहेत. आज दिवसभरात वसई विरार नालासोपाऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणावून वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी चक्क 30 साप पकडले. या सापांना सुखरूप जंगलात सोडण्यात आले आहे.
वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडलेल्या सापांमध्ये नाग, घोणस, कोब्रा यासह अन्य विषारी सापांचा समावेश आहे. पावसाळ्यात एकीकडे पाणी तुंबल्याने हाल होत असतानाच आता थेट विषारी सापांचा शिरकाव होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. लहान लहान शाळकरी मुले शाळेत जाताना-येताना पाण्यातूनच चालत असतात. यावेळी रस्त्यावर या प्रकारच्या सापांचा दंश होण्याचाही धोका वाढल्याने पालकही काळजीत पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, उल्हासनगरमध्ये देखील अशाच प्रकारे एक साप निघाला होता. त्यावेळी एका युवकाने या सापाला रस्त्यावर आपटून मारल्याचा प्रकारही घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर बदलापूर वन विभागाने साप मारणाऱ्या युवकाला अटक केली होती.
वाशिम जिल्ह्यातही वाळकी जहांगीर येथे एका शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी सुरू असताना थेट ट्रॅक्टरच्या सीटखालूनच साप निघाला. त्यामुळे घाबरुन चालकाने चालू ट्रॅक्टरवरून उडी मारली. यात चालक जखमीही झाला होता.