हिरव्या पावसानंतर डोंबिवलीत हिरव्या आणि निळ्या पाण्याचे नाले
डोंबिवलीत एकदा हिरवा पाऊस पडला होता. त्यानंतर आत्ता डोंबिवलीतून थेट निळ्या आणि हिरव्या रंगाचा नाला वाहताना दिसत आहे.
ठाणे : डोंबिवलीत हिरव्या पावसानंतर आता थेट निळ्या आणि हिरव्या रंगाच्या पाण्याचे नाले वाहताना दिसत आहेत. त्यामुळे येथील प्रदूषण नियंत्रणाबाहेर असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रदूषणाबाबत एमआयडीसीने (MIDC) आपली जबाबदारी झटकत प्रदूषणासाठी कंपन्यांना जबाबदार धरले आहे. मात्र, या प्रदूषणाच्या त्रासाने डोंबिवलीतील नागरिक मात्र त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांकडून प्रदूषणाविरोधात लढा सुरु आहे.
डोंबिवलीच्या नांदीवली नाल्यातून अक्षरशः निळे आणि हिरवे प्रदूषित पाणी वाहत होते. त्याचा त्रास रविवारी सायंकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 2 तास झाला. नागरिकांनी या हिरव्या नाल्याविषयी तक्रारही केली आहे. 2014 मध्ये डोंबिवलीत हिरवा पाऊस पडल्याने प्रदूषणाचा विषय चर्चेत आला होता. त्यानंतर प्रदुषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळासह सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्यांकडून करण्यात आला. प्रत्यक्षात प्रदूषण कोठेही कमी झालेले नाही. रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट नाल्यात सोडले जात असल्याने नाल्यातून रसायनमिश्रित हिरवे प्रदूषित पाणी वाहत होते. त्याचा परिसरातील नागरिकांना चांगलाच त्रास झाला. हिरव्या पावसानंतर निळा हिरवा नाला वाहत असल्याचे समोर आले. ही केवळ एक दिवसाचीच तक्रार नाही. त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून डोळेझाक केली जात आहे.
एमआयडीने याप्रकरणी सर्व कंपन्यांना नोटीस बजावल्या आहेत. या नोटीसमध्ये एमआयडीसीने म्हटले आहे, “नाल्यात कापड, धागे, प्लास्टीक अडकून चेंबर्स ओव्हरफ्लो होत आहेत. त्याचबरोबर या वाहिन्यांमधून केवळ रासायनिक सांडपाणी न सोडता त्याद्वारे पावसाचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी नाल्यात जाऊन मिसळते. पावसाचे सांडपाणी एका स्वतंत्र वाहिनीद्वारे नाल्यात सोडावे, असे कंपन्यांना सूचित केले आहे. अन्यथा कारखाने बंद करण्यात येतील.”