मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. दोन दिवस ही बैठक मुंबईत सुरू होती. बैठकीला 28 पक्षांचे नेते आले होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीतून सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला पाचारण करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गट या बैठकीचे संयोजक होता, तरीही आंबेडकरांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याने आंबेडकर यांचा पारा चढला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंबेडकरांना बैठकीचं निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? असा सवाल करून आंबेडकरांना डिवचलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी ट्विट करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केला आहे.
आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं.भाजप-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर यांनी ट्विट करून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जातीय मानसिकतेवरच बोट ठेवलं आहे.
यावेळी आंबेडकर यांनी विजय वडेट्टीवार यांचाही समाचार घेतला आहे. इंडिया अलान्समध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात?, असा थेट सवाल आंबेडकर यांनी वडेट्टीवार यांना केला आहे.
लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आम्हाला फक्तं समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं.
भाजप-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.#IndiaAlliance मध्ये… pic.twitter.com/fEYsNuPZf8
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 8, 2023