राऊत यांच्या टीकेनंतर नाना पटोलेही बरसले; थेट शिवसेनेच्या नेतृत्वावरच ठेवलं बोट; काय म्हणाले पटोले?
मला विधानसभा अध्यक्ष पद देण्याचा निर्णय हा सोनिया गांधी यांचा होता. मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णयही सोनिया गांधी यांचाच होता. पक्षाचा आदेश पाळणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम होतं.
मुंबई: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं नसतं, असं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या आरोपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला असून शिवसेनेच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं आहे. मी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळलं नसतं असं म्हणता तर तुमचं नेतृत्व कमी पडत होतं, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो. मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं. मी राहिलो असतो तर महाविकास आघाडीचं सरकार राहिलं असतं. अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते माझ्या शक्तीचा परिचय करून देत आहे. त्यांनी माझ्या शक्तीचा देशाला परिचय करून दिला आहे, असा चिमटा काढतानाच पण ज्या पक्षाचे जे कोणी खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचं नेतृत्व कमी पडत होतं का? असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे का? हा प्रश्न निर्माण होतो, असा चिमटा नाना पटोले यांनी काढला.
राऊतांना सल्ला, पण
मला संवैधानिक अधिकार होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं नाही केलं, त्यावर ते बोलत नाहीत. राऊत यांनी हे प्रश्न काढल्याने महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न निकाली निघणार नाही. राऊतांनी या प्रश्नात लक्ष घालावं. भाजपने खोक्यानं सरकार पाडलं.
आपण राज्यातील प्रश्नावर लक्ष दिल्यास भाजपला उत्तर देऊ शकतो. मी फक्त राऊतांना सल्ला देऊ शकतो. मी काही विद्वान नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
तो निर्णय हायकमांडचा
मला विधानसभा अध्यक्ष पद देण्याचा निर्णय हा सोनिया गांधी यांचा होता. मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णयही सोनिया गांधी यांचाच होता. पक्षाचा आदेश पाळणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम होतं. हायकमांडच्या निर्णयावर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर ते योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बैठकीला नसणार
उद्या संध्याकाळी काँग्रेस प्रभारी एच के पाटील येत आहेत. ते हाथ से हाथ जोडो कार्यक्रमाचा आढावा घेतील. काँग्रेसमध्ये कुठेही वाद नाही. काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. त्यांच्या जिव्हारी पराभव लागला आहे.
त्यामुळे आम्हाला बदनाम केलं जातंय. माझं एच के पाटील यांच्याशी बोलणं झालं आहे. मी पुण्यात निवडणुकीसाठी जात आहे. मी बैठकीला नसणार आहे. तसं मी वरिष्ठांना कळवलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.