मुंबई: 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने (BJP) ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबीज केली. त्याच गुजरातमधे कोरोनाची दुसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल ना केवळ खुद्द स्थानिक प्रसार माध्यमांनी खरी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाड़े काढले. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खड़े बोलही सुनावले. यामुळे, गुजरातचे “अकार्यक्षम मॉडेल”च आता देशापुढे उघड़ झाले आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे. (Congress leader Anant Gadgil Take a dig at PM Narendra Modi)
उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात सामूदायिकरित्या शेकडो प्रेतांना अग्नी दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली. तर दुसरीकडे पवित्र गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली. उत्तर प्रदेश हे आता “नाथांचे नसून अनाथांचे राज्य” बनत चालले असल्याचे गाडगीळ यांनी उपरोधिकपणे म्हटले.
गोव्यात ऑक्सिजनअभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. “मुख्यमंत्र्यांवर राणेंची (विश्वजीत) आगपाखड़” हे महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यात भाजपमधील दररोजचे चित्र आहे, असा टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बंगळुरु शहरात महापालिकेला एकूण 13 पैकी आता 7 स्मशानभूमी या कोरोना-मृतांसाठी राखीव ठेवाव्या लागल्या आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता भाजपची सरकारे असलेल्या राज्यातच मोदी मॉडेलचा फज्जा उडाला असल्याची अनंत गाडगीळ यांनी म्हटले.
मोदी सरकारच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात नोटाबंदी, जीएसटी आणि कोरोनामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. तरीही भाजपचे नेते वर्धापनदिन साजरा करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना उत्सव साजरा करु नका असा आदेश काढावा लागल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
संबंधित बातम्या:
गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा; नवाब मलिक कडाडले
आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय, संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका
मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली, नाना पटोलेंची घणाघाती टीका
(Congress leader Anant Gadgil Take a dig at PM Narendra Modi)