अन्यथा सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नसेल; काँग्रेसचा पहिला रोखठोक इशारा
काँग्रेसच्या लोकांना घ्यायचेच असेल तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांशी चर्चा केली पाहिजे. सरकार टिकवण्याची जबाबदारी ही एकट्या काँग्रेसची नाही, असे नसीम खान यांनी सांगितले. | Naseem Khan
मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्या पक्षातील लोकांना फोडले जाते. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे चालले पाहिजे. अन्यथा सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नसेल, असा इशारा काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिला. (Naseem Khan take a dig at NCP and Shivsena)
काही दिवसांपूर्वी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. याविषयी नसीम खान यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. आमच्या पक्षातील लोकांना इतर पक्षात घेतले जाते. यामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने असे वागू नये. काँग्रेसच्या लोकांना घ्यायचेच असेल तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांशी चर्चा केली पाहिजे. सरकार टिकवण्याची जबाबदारी ही एकट्या काँग्रेसची नाही, असे नसीम खान यांनी सांगितले.
‘काँग्रेसच्या आमदारांना निधी दिला जात नाही’
अमीन पटेल, झिशान सिद्दीकी या आमदारांना सरकारकडून निधी दिला जात नाही. हे मुद्दाम केले जात आहे का? मुंबईत काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी काँग्रेसने 227 महापालिका वॉर्डांमध्ये निवडणूक लढवावी आणि काँग्रेसचा महापौर बसेल यासाठी प्रयत्न करावेत, असेही नसीम खान यांनी म्हटले.
‘राहुल गांधींकडे बोट दाखवणाऱ्याचे बोट तोडून दाखवू’
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षाविषयी बोलण्याचा अधिकार सामना आणि शिवसेनेला कोणी दिला? जो पक्ष यूपीएचा भाग नाही त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. सोनिया गांधी याच यूपीएच्या अध्यक्ष राहतील. तसेच राहुल गांधी यांच्याकडे बोट दाखवणाऱ्याचे बोट तोडले जाईल, असा इशाराही नसीम खान यांनी दिला.
संबंधित बातम्या:
…. तर मुंबईचं महापौरपद काँग्रेसकडेच, बाळासाहेब थोरातांनी दंड थोपटले
मुंबईचा महापौर आपल्याशिवाय बसू शकत नाही, काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला इशारा?
(Naseem Khan take a dig at NCP and Shivsena)