टीव्ही9 मराठी स्पेशल रिपोर्ट : कसब्यात पोलिसांच्याच मदतीनं भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटतात?, कसब्यात चढला राजकीय पारा
पोलिसांच्याच मदतीनं भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. कसब्यात राजकीय पारा कसा वाढलाय, पाहुयात.
मुंबई : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. पण त्याआधी कसब्यातले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी गंभीर आरोप केला. पोलिसांच्याच मदतीनं भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. कसब्यात राजकीय पारा कसा वाढलाय, पाहुयात.
कसब्यात पैसे वाटपाचा आरोप आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचं कुटुंब आणि कार्यकर्त्यांसह उपोषण. कसब्यात मतदानाच्या ठिक एक दिवसाआधी, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी गंभीर आरोप केलाय. पोलिसांच्याच मदतीनं, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप करत, एक व्हिडीओच धंगेकरांनी समोर आणला आणि कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले.
धंगेकर जवळपास 10 वाजता उपोषणाला बसले आणि एक वाजताच्या सुमारास पोलीस धंगेकरांच्या उपोषणस्थळी आले. धंगेकरांना पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि 3 तासांत धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं तर धंगेकरांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंनी धंगेकरांचं उपोषण म्हणजे स्टंटबाजी असल्याचं म्हटलंय.
खरं तर प्रचार शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजताच संपला पण प्रचार संपल्यावरही उपोषण करणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचं सांगत भाजपनं निवडणूक आयोगात धाव घेतली आणि धंगेकरांची उमेदवारीच रद्द करण्याची मागणी भाजपनं केलीय.
धंगेकरांच्या उपोषणावरुन, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. कसब्यात जिंकण्यासाठी, फडणवीसांकडूनच पैशांचा महापूर सुरु असल्याचं अंधारे म्हणाल्यात. त्या टीकेला फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलंय. कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट आणि काट्याची लढत आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या दिग्गजांनी कसून मेहनतही घेतली पण पैसे वाटल्याच्या आरोपांवरुन, कसब्यात मतदानाआधी वातावरण नक्कीच तापलं.
आता पोलिसांनी धंगेकरांनी दिलेले व्हिडीओ ताब्यात घेतलेत. आता खरंच पैसे वाटले का? आणि कोणी वाटले ?, याचा तपास आता पोलीस करतायत.