चव्हाण, देवरांनंतर काँग्रेसला आणखी एक झटका, आमदाराचं जाहीर वक्तव्य, ‘आता काहीच सांगू शकत नाही’
निवडणूक तोंडावर असताना काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं दिसत आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर आता एक आमदार काँग्रेसचा हात झटकण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूका तोंडावर असताना काँग्रेस पक्षाला गळती लागल्याचं दिसत आहे. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला रामराम केल्याने काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात डॅमेज झालं आहे. आधीच बडे नेते पक्ष सोडून जात असताना काँग्रेसच्या एका आमदाराने केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आलं आहे. निवडणूका तोंडावर असताना काँग्रेसमध्ये राहणार की नाही याबाबात काही सांगू शकत नसल्याचं म्हटलं आहे. कोण आहेत ते आमदार ज्यांनी जाहीरपणे पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की त्यांचा फोन मी उचलला नाही. त्यांनी आधी आपला मतदार संघ बघावा. ज्या गोष्टी सुरु आहेत त्यामुळे काँग्रेसची अल्पसंख्यांक मते कमी होतील. त्यांना जर आमची गरज नसेल तर आमचा विचार करायला आम्ही समर्थ आहोत. मला जर आधी विचारलं असतं की, मी काँग्रेसमध्ये राहणार का? तर हो म्हणालो असतो पण आता मी नाही सांगू शकत की मी काँग्रेस मध्ये राहिल. काँग्रेसला आमची गरज नाही मग मी पक्षात राहून काय करू? आम्हाला पर्याय आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईल, असं झिशान सिद्दिकी म्हणाले.
शिवसेनेसारखी दुटप्पी पार्टी आजपर्यंत नाही बघितले. जेव्हा वज्रमुठ सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरे येऊन म्हणतात की माझ्या हिंदू बांधव आणि भगिनी. आम्ही बाबरी पडली असं म्हणतात.. ही बोलायची पद्धत आहे का? आम्ही बीकेसीच्या एकाच मंचवर बसलोय आणि ते म्हणतात की बाबरी आम्ही पाडली, लाज वाटते का? अशा पक्षांसोबत काँग्रेस कशी जाऊ शकते? अनिल परब माझ्या मतदार संघात मस्जित तोडतात आणि तरीही त्यांना वाटत की मुस्लिम त्यांना मत देतील. मी भारत जोडो यात्रेत गेलो तर मला हाकलून दिले मला म्हणाले कि वजन कमी कर आणि मग ये…तुमच्या घरचे खातो का? राहुल गांधी यांची टीम फार वाईट असल्याचं म्हणत झिशान सिद्दिकी यांनी आपल्या मनात दाबून ठेवलेलं बाहेर काढलं.
दरम्यान, मविआ सरकारच्या काळात झिशान सिद्दिकी यांना दाबण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. मात्र, त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झिशाना सिद्दिकी हे ही आता काँग्रेसचा हात झटकण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत.