रवी राजा यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश का केला? वर्षा गायकवाड यांनी नेमकं कारण सांगितलं
Varsha Gaikwad on Ravi Raja : रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...
विधानसभा निवडणूक काळात मुंबईत बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी नगरसेवक, मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते राहिलेले रवी राजा यांनी काँग्रेस पक्ष सोडला. आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. रवी राजा यांच्याशी आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. पण इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहून ते का गेले माहीत नाही. काँग्रेसने त्यांना सगळं काही दिलं. महापालिकेत विरोधी पक्षनेते पद दिलं. इतर महत्वाची पदं दिली. पण तरी देखील ते भाजपमध्ये गेले हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
रवी राजा यांनी काँग्रेस पक्ष का सोडला?
माझ्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे. रवी राजा धारावीमधून कसे लढले असते? ती जागा एससी आहे. त्यांना सायनची जागा हवी होती. ती न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. जो योग्य उमेदवार होता. त्याला ही जागा देण्यात आलीये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. रवी राजा यांना कोवीड काळात ज्या नोटीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आहे. भीतीपोटी काँग्रेस सोडली. काँग्रेस मध्ये कुठलेच अंतर्गत कलह नाहीत. मुंबई काँग्रेसमध्ये योग्य पद्धतीने काम सुरू आहे. काहीजण नरेटीव्ह पसरविण्याचं काम करत आहेत, असं गायकवाड म्हणाल्या.
महायुतीतील ओढाताणीवर भाष्य
नवाब मलिकांचा प्रचार फडणवीस करणार का? महायुतीत अंतर्गत धुसफुस सुरू आहे. महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी ओढाताण सुरू म्हणून वाक्य सेंसर करण्यास सांगितलं. राहुल गांधींच्या सभेची मोठी तयारी सुरू आहे. सहा नोव्हेंबरला बीकेसीत भव्य सभा होईल. त्याची तयारी सुरु आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्यात.
आशिष शेलारांच्या चौकशीची मागणी
30 ऑक्टोबरला आमची काँग्रेस पक्षाचे वांद्रे पश्चिमचे उमेदवार असिफ झकेरिया यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे काही तक्रारी केले आहेत. आशिष शेलार यांच्या प्रतिज्ञापत्रातील फॉर्म नंबर 26 आक्षेप नोंदवले आहेत. आशिष शेलार यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या पत्नीच्या रियल इस्टेट आणि क्रीडा व्यवसाय संदर्भातील कुठल्याही प्रकारची मालकीची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली आहे.