ठाणे ते पनवेल मार्गावरील दिघा स्थानक बांधून पूर्ण, या तारखेला उद्घाटन होणार !
एमएमआरव्हीसीने मध्य रेल्वेला दिघा स्थानकाचे काम पूर्ण झाल्याचे कळविले आहे, काही फिनिशींगची जूजबी कामे शिल्लक आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात दिघा स्थानकाचे ओपनिंग होईल का ?
मुंबई : ठाणे ते पनवेल ट्रान्सहार्बर ( transharbourline ) मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे ( Digha station ) बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या नव्या स्थानकाचे उदघाटन नेमके केव्हा होणार याची मुंबईकरांना प्रतिक्षा लागली आहे. दिघा रेल्वे स्थानकाच्या सेवेत येण्यामुळे कळवा ( kalwa ) तसेच विठावा, पारसिक हील परीसरातील ज्या नागरीकांना वाशी-पनवेलसाठी ठाणे ( thane ) स्थानकापर्यंत यावे लागते त्यांना आता दिघा स्थानकावरुन पनवेल-वाशी गाठणे सोपे होणार आहे. पाहूया काय आहे स्तिथी…
दिघा स्थानक हा 476 कोटी रुपयांच्या ऐरोली ते कळवा एलिवेटेड लिंकचा एक भाग आहे. या ऐरोली ते कळवा एलिवेटेड प्रकल्पामुळे कल्याणहून नवीमुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकात न उतरता कळवा येथे उतरून ट्रान्सहार्बरची लोकल पकडता येणार आहे. परंतू ऐरोली ते कळवा एलिवेटेड प्रकल्पा हा प्रकल्प पुनर्वसनाच्या भिजत घोंगड्यामुळे वर्षांनुवर्षे रखडला आहे. त्यामुळे आता केवळ ठाणे ते पनवेल-वाशी मार्गावरील दिघा स्थानक उघडून समाधान मानले जाणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळ एमयूटीपी – 3 अंतर्गत दिघा स्थानकाचे बांधकाम करीत आहे. या स्थानकाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. केवळ शेवटचा हात मारणे सूरु असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अनेक रेल्वे प्रकल्पांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई ते सोलापूर आणि शिर्डी अशा वंदेभारत एक्सप्रेसचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आम्ही मध्य रेल्वेला दिघा स्थानकाचे काम पूर्ण झाल्याचे कळविले आहे, काही फिनिशींगची जूजबी कामे शिल्लक आहेत असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ( एमएमआरव्हीसी ) म्हटले आहे. हे नवे दिघा स्थानक ऐरोली स्थानकानंतर येते, हे स्थानक कळवा ते ऐरोली अशा 8 किमीच्या एलिवेटेड कॉरीडॉरचा एक भाग आहे.
एमयूटीपी – 3 अंतर्गत एमएमआरव्हीसी कळवा ते ऐरोली एलिवेटेड कॉरीडॉरचे बांधकाम करीत आहे. या एलिवेटेड कॉरीडॉरने कल्याण आणि डोंबिवलीच्या प्रवाशांना नवीमुंबईला जाण्यासाठी गर्दीच्या ठाणे स्थानकात उतरण्याची काही गरज राहणार नाही.
ठाणे स्थानक मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दी होणारे स्थानक आहे. येथे डोंबिवलीनंतर सर्वाधिक गर्दी होत असते. या स्थानकातून रोज चार लाख प्रवासी ये-जा करीत असतात. त्या दिघा स्थानकाच्या सेवेत येण्याचा फायदा कळवावासियांना होणार असल्याचे म्हटले जात असून ठाणे स्थानकाची गर्दी कमी होणार आहे.
ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे कॉरिडॉर का रखडलाय
8 किमीचा ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे कॉरिडॉर दोन टप्प्यात तयार होत आहे. पहिल्या टप्प्यात भूसंपादनाची गरज नसलेले दिघा स्टेशन पूर्णत्वास येत आहे. दुसऱ्या टप्प्यात एमएमआरडीएच्या मदतीने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला भूसंपादन तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे आणि पुनर्वसन करावे लागणार आहे. कळवा आणि ऐरोली येथील 2.55 हेक्टर जमिनीपैकी 1.95 हेक्टर भूसंपादन करण्यात आले असून उर्वरित 0.60 हेक्टर भूसंपादनाची प्रक्रीया रखडली आहे. पारसिक हील येथील कुटुबांना पर्यायी घरे त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून खूपच दूरवर दिल्याने त्यांनी ती नाकारली आहेत. त्यामुळे ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे कॉरिडॉर का रखडला आहे.