Covid 19 : मुंबईत आतापर्यंत 10 हजार रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू
मुंबईसह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने मुंबई-दिल्लीसारख्या शहरांमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत आहेत.
मुंबई : मुंबईसह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने मुंबई-दिल्लीसारख्या शहरांमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत आहेत. यातच मुंबईतील कोरोनाबाधितांची समोर आलेली आकडेवारी भीतीदायक आहे. मुंबईत आतापर्यंत 10 हजार कोरोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. (Corona Death Toll in Mumbai) या परिस्थितीत दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईत आतापर्यंत 88 टक्के कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (Coronavirus : Mumbai is first Indian city with over 10000 Covid-19 deaths)
मुंबईत शनिवारी 1 हजार 257 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 50 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण मृतांची संख्या 10 हजार 16 इतकी झाली आहे. ज्या बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 85 टक्के लोक हे 50 वर्षांहून अधिक वयाचे होते.
देशाची आर्थिक राजधानी अससेल्या मुंबईत आतापर्यंत 2,50,061 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 10,016 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2,19,152 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी 898 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट 88 टक्के आहे, तर ग्रोथ रेट हा 0.58 टक्के आहे. काल रात्रीपर्यंत मुंबईत 19 हजार 554 अॅक्टिव्ह रुग्ण होते.
महाराष्ट्रात आतापर्यंत 16 लाख 38 हजार 961 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 14 लाख 55 हजार 107 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 43 हजार 152 बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 40 हजार 194 अक्टिव्ह रुग्ण आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनाबाधित
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप असल्याने डॉक्टरांनी फडणवीसांवर उपचार सुरु केले आहेत.
कोरोनारुपी रावणाचा नाश करुया : मुख्यमंत्री
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. “कोरोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल”, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. नियम पाळून, योग्य काळजी घेऊन एकजुटीने कोरोनारुपी रावणाचा नाश करुया, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या
मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयात न्या, महाजनांना सांगितल्याप्रमाणे फडणवीस सेंट जॉर्जमध्ये
Special Report | देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, अजित पवारही क्वॉरंटाईन
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
फडणवीससाहेब, काळजी घ्या आणि कोरोनावर मात करा, रोहित पवारांकडून सदिच्छा
देशातील नागरिक कोरोनानं त्रस्त, प्रत्येकाला मोफत लस मिळावी: अरविंद केजरीवाल
(Coronavirus : Mumbai is first Indian city with over 10000 Covid-19 deaths)