मुंबई: कोरोना लशींच्या तुटवड्यामुळे जवळपास तीन दिवस ठप्प असलेले मुंबईतील लसीकरण मोहीम सोमवारपासून पुन्हा एकदा सुरु झाली. लस घेण्यासाठी मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर (Vaccination centres) मुंबईकरांनी गर्दी केली आहे. सकाळी सहापासून लोक लस घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. अनेकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध असेल. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. मात्र, मुंबईच्या लसीकरणाचा वेग पाहता हे डोस फारतर दोन दिवस पुरतील. त्यानंतर पुन्हा काय करायचे, असा प्रश्न मुंबईतील आरोग्ययंत्रणांना पडला आहे.
मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे सोमवारी लसी उपलब्ध झाल्यानंतर दहिसरमध्ये नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर एकच गर्दी केली. दहिसर पूर्व जंबो लसीकरण सेंटरमध्ये व्हॅक्सिनेशनसाठी नागरिकांनी पहाटे साडेतीन वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. या केंद्राच्या प्रवेशद्वारापासून बाहेर शंभर ते दीडशे मीटर लांब नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.
कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस (mucormycosis) आजार आता आटोक्यात येऊ लागला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून म्युकोरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 804 रुग्णांपैकी 436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 212 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून यात मुंबईतील केवळ 70 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये केवळ 30 टक्के रुग्ण मुंबईचे आहेत. मुंबईत आतापर्यंत पालिका आणि खासगी रुग्णालयात म्युकर मायकोसिसचे 804 रुग्ण दाखल झाले. त्यातील 156 जणांचा म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू झाला. तर सद्यस्थितीत केवळ 212 सक्रिय रुग्ण आहेत.
तसेच मुंबईत आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे एकूण 232 रुग्ण आढळले. यात 47 जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईत 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ 70 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत मुंबईबाहेरचे 532 रुग्ण दाखल झाले. यातील 109 जणांचा मृत्यू झाला. तर 321 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून तर 142 सक्रिय रुग्ण आहेत.
संबंधित बातम्या:
मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?
(Coronavirus vaccination in Mumbai)