“तात्काळ दुरुस्ती करा, आम्हाला दाखवा मगच प्रदर्शित करा” हर हर महादेव म्हणजे इतिहासाची मोडतोड, ‘या’ संघटनेचा इशारा
आम्हाला दाखवा मगच प्रदर्शित करा असा थेट इशारा चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या वाहिनी, लेखक अभिजित देशपांडे यांना दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट आता प्रदर्शित होणार की नाही हा सवाल उपस्थित झाला आहे.
पुणेः ‘हर हर महादेव’ या चित्रपटाविषयी दिवसेंदिवस इतिहासाच्या मुद्यावरून वाद वाढतच चालला आहे. काही दिवसापूर्वी मनोरंजनाच्या एका खासगी वाहिनीवरुन हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर हर हर महादेव चित्रपटात दाखवण्यात आलेला इतिहास हा मोडतोड करून दाखवण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड संघटनेने त्यावर आक्षेप नोंदवर चित्रपट परीक्षण महामंडळ आणि केंद्र सरकारकडे त्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेडने आपली भूमिका स्पष्ट करत या चित्रपटात दाखवण्यात आलेला चुकीचा इतिहास तात्काळ दुरुस्त करा.
आम्हाला दाखवा मगच प्रदर्शित करा असा थेट इशारा चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या वाहिनी, लेखक अभिजित देशपांडे यांना दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट आता प्रदर्शित होणार की नाही हा सवाल उपस्थित झाला आहे.
संभाजी ब्रिगेडेच कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी या चित्रपटाविषयी मत मांडताना लेखक आणि खासगी वाहिनीवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले की, या चित्रपटांमध्ये इतिहास तोडून मोडून वापरण्यात आलेला आहे.
इतिहासाचे विकृतीकरण करण्याचं काम या चित्रपटाच्या टीमने केले आहे. त्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. आणि चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर तो तात्काळ दुरुस्त करून आम्हाला दाखवल्यानंतर प्रदर्शित करण्यावर विचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार असतील, मावळे असतील अत्यंत वादग्रस्त पद्धतीने अभिजित देशपांडे यांनी हर हर महादेव चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी घराघरांमध्ये जो प्रदर्शित केला जाणार होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवत या चित्रपटात दुरुस्ती केल्या जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रात हा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडने अशा चित्रपटांवर तात्काळ बंदी घालून जर कोणी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महराज यांची बदनामी करत असेल तर चित्रपट कोणत्याही परिस्थिती प्रदर्शित होऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.