Cyclone in Maharashtra : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील 6 हजार 500 पेक्षा जास्त नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित, प्रशासनाची खबरदारी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किनारपट्टीवर दाखल झाली आहेत. त्यांच्याकडून किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे.
मुंबई : गोव्यात आपलं रौद्र रुप दाखवणाख्या तौत्के चक्रीवादळानं आता आपला मार्ग कोकणाकडे वळवलाय. आज मध्यरात्रीपर्यंत हे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळता येणार नसलं तरी जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनानं मोठी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापनाची पथकं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किनारपट्टीवर दाखल झाली आहेत. त्यांच्याकडून किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे. (More than 6500 people were evacuated from the coast of Ratnagiri, Sindhudurg and Raigad)
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 तर रायगड जिल्ह्यातील 2 हजार 500 नागरिकांचा समावेश आहे. तशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. तौत्के चक्रीवादळ आज रात्री उशिरा रायगड किनारपट्टीवर धडक देईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. त्यामुळे किनारपट्टी लगतच्या भागातील नागरिकांचं स्थलांतर सुरु आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्त्यातील 1600 लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जिल्ह्यांतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर. रत्नागिरी जिल्ह्यातील ३८९६, सिंधुदुर्ग- १४४ आणि रायगड जिल्ह्यातील २५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले- आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती#TauktaeCyclone #Tauktae #cyclonetaukate pic.twitter.com/KLNEc4nqSh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 16, 2021
जोरदार पावसाचा इशारा
वादळाबरोबरच रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. यावेळी कुणीही घराबाहेर पडू नका, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
लसीकरण बंद, रुग्णांसाठी उपाययोजना सुरु
कोरोना संकटाच्या काळात ताऊक्ते चक्रीवादळामुळे चिंता अधिक वाढलीय. जिल्हात 59 खासगी आणि सरकारी रुग्णालयात कोविड रुग्ण ऑक्सिजन आणि ICU मध्ये आहेत. तर जिल्ह्यात 10 हजारापेक्षा अधिक कोरोना असल्यानं प्रशासनानं त्याबाबत तयारी सुरु केलीय. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील लसीकरण बंद राहणार आहे. तसंच हे दोन दिवस फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा सुरु राहणार आहेत.
गोव्यात दोघांचा मृत्यू
गोव्यात तौक्ते वादळामुळे प्रचंड दाणादाण उडाली आहे. या वादळामुळे गोव्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात विजेचा खांब पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याचा मृत्यू झाड अंगावर पडल्याने झाला आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच मच्छिमारांनाही सावध राहण्याचा आणि समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
More than 6500 people were evacuated from the coast of Ratnagiri, Sindhudurg and Raigad