मुंबई : तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिवसभर सुरु असलेल्या या पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत केलं आहे. मात्र, धोका अजूनही टळलेला नाही. कारण मुंबईतील हा पाऊस पुढचे आणखी 24 तास पडणार असून काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे (Heavy Rainfall in Mumbai).
वारे ताशी कमाल 120 किमी वेगाने धावण्याचा अंदाज
कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर ताशी कमाल 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे (Heavy Rainfall in Mumbai). मुंबई शहरात आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरात 115 मिमी आणि पूर्व उपनगरात 61 मिमी पावसाची नोंद झालीय.
मुसधार पावसाने जनजीवन विस्कळीत
मुंबईत तुफान पावसामुळे अवघ्या काही तासातच शहरातील जनजीवन विस्कळीत झालं. ढगाळ वातावरण आणि पावसाचे पाणी भरू लागल्याने लोकल सेवा ठप्प झाली. वादळामुळे विमान सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईत रात्री आठ वाजेपर्यंत विमान सेवा बंद असणार आहे. तसेच चक्रीवादळाने सकाळपासून रौद्ररुप धारण केलेल्या राज्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहेत. मुंबईवरील वादळाचा धोका अजून टळलेला नसल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
#WATCH | Maharashtra: Arabian Sea turns rough, in wake of #CycloneTaukte. Visuals from Marine Drive in Mumbai. pic.twitter.com/ovbFFJPruQ
— ANI (@ANI) May 17, 2021
मुंबईत आज ताशी 114 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. हे वादळ आधीच्या वादळांपेक्षा सर्वात मोठं आणि भयंकर असं वादळ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची आणि झाडांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले आहे. कोणताही अनर्थ ओढवू नये म्हणून मुंबईत एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीम तैनात असून राज्यभरात एकूण 12 टीम तैनात आहेत.
मुंबईत येत्या काही तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याने वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. वादळामुळे प्रभावित झालेल्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवता यावे म्हणून मुंबईत 5 ठिकाणी शेल्टर होम बनविण्यात आले आहेत. तसेच एनडीआरएफच्या तीन टीमसह फायर ब्रिगेडच्या सहा टीमही तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईत 11 तासांसाठी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच सकाळी काही फ्लाईटस डायव्हर्ट करण्यात आले होते. त्याशिवाय मोनोरेल सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. तर, अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.
>> राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेत येऊन चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच सर्वांनी सतर्क राहण्याचा इशाराही दिला. मुंबईत पाणी भरू नये याकडे आम्ही लक्ष देत आहोत. या पूर्वी असं वादळ पाहिलं नाही. वित्त आणि जीवित हानी होणार नाही याकडे आमचं लक्ष आहे. या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र मिळून काम केलं पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
>> जोराच्या वाऱ्यामुळे घाटकोपर-विक्रोळी दरम्यान लोकलवर झाडाची फांदी पडली. त्यामुळे रेल्वे सेवा बाधित झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी लोकल थांबवण्यात आल्या आहेत.
>> मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्त्यांवरही पाणी साचले आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
>> हवामान खात्याने राज्यात ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. वादळामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी लगत एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. लोकांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे