गिरीश गायकवाड, मुंबईः दादर स्टेशनची (Dadar Station) संध्याकाळ. ७.३० ते ८.०० वाजता. गावखेड्यातून आलेल्या6 जणी. तिकिट काउंटरजवळच जमिनीवर बॅनर टाकून बसलेल्या. अंगाभोवती कुडकुडडाणी थंडी (Cold) अन् चेहऱ्यावर असंख्य प्रश्नांचं मोहोळ.. जवळ जाऊन विचारलं तर त्या पोलीस भरतीसाठी (Police recruitment) आल्याचं कळलं. पण नियोजित ठिकाणी रहाण्याची व्यवस्था फुल्ल झाल्यानं कालची रात्र त्यांनी स्टेशनवरच काढण्याचं ठरवलं.. आजूबाजूने जाणाऱ्या वाईट नजरांचे झेलत स्वतःचं रक्षण करत रात्र काढायची अन् सकाळी ५ वाजता ग्राउंडवर हजर व्हायचं.. या चिंतेने ग्रासलेल्या मुली पाहून एका जागृत तरुणीनेच पुढाकार घेतला अन् थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत हा पेच मांडला. एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसमधून तत्काळ सूत्र हलली अन् या तरुणीच्या सुरक्षित राहण्याची सोय झाली. याच तरुणीने सोशल मीडियावर मांडलेला हा प्रसंग सध्या मुंबईत अन् राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.
इतरांच्या मुलींबाबत हे घडतंय, तोपर्यंत आपल्याला या प्रसंगाचं गांभीर्य कळणार नाही. एकदा तरी या मुलींच्या जागेवर आपल्या मुलींना ठेवून पहा आणि मग बघा, अशा शीर्षकाखाली ही सोशल मीडियातील पोस्ट लिहिण्यात आलीय. अस्मिता पुराणिक या जागृत तरुणीने स्टेशनवर दिसलेल्या सहा मुलींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागितलेल्या मदतीचा हा किस्सा सध्या चर्चेत आहे..
नाशिक जिल्ह्यातून या ६ मुली मुंबईत नायगाव येथे पोलीस भरतीसाठी आल्या आहेत. मात्र नायगाव येथे भरती प्रक्रियेच्या ठिकाणी अचानक राहण्याची जागा फुल्ल झाल्याचं सांगण्यात आलं. खूप वेळ कुणीच मदत करत नसल्याचं पाहून रात्र काढायची कशी, असा प्रश्न उभा राहिला. त्यातूनच त्यांनी दादर स्टेशन गाठायचं ठरवलं…
गावखेड्यातून आलेल्या या मुलींनी मदत मागूनही न मिळणं ही अत्यंत शरमेची बाब. अशा मुलींबाबत काही बरंवाईट झालं असतं तर त्यासाठी जबाबदार कोण, या विचारातून तरुणीनं मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला.
एकनाथ शिंदे यांचा फोन व्यग्र असल्याने वर्षा बंगल्यावर फोन केला. एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे यांनी ही समस्या ऐकून घेतली. तत्काळ स्टेशन मास्तर अमित खरे, डेप्युटी स्टेशन मास्तर पांडेय यांच्याशी फोनवर संवाद साधला अन् सहा मुलींना रात्री सुखरुप राहण्याची, वेटिंग रुममध्ये राहण्याची व्यवस्था केली.
दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने रात्री पुरेसं जेवण आणि सुरक्षित झोप घेण्याची व्यवस्था करण्यात आली. आमच्यावर बेतलेला प्रसंग टळला, पण इतरही अनेक जणींवर अशी वेळ आली असेल ही भीती कायमचीच संपली तर बरं होईल, अशी प्रतिक्रिया या मुलींनी व्यक्त केल्याचं सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलंय.