‘कोणीतरी माझा फोन खेचतंय’, पत्नीला अखेरच्या कॉलने हत्येचं गूढ उकललं
आपला फोन कोणीतरी खेचत असल्याचं मयत व्यक्तीने पत्नीशी फोनवर बोलताना अखेरच्या क्षणी सांगितलं. हाच धागा पकडत दहिसर पोलिसांनी अवघ्या 30 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या
मुंबई : पश्चिम दृतगती महामार्गावर दहिसरजवळ सापडलेल्या मृतदेहाचं गूढ अवघ्या 30 तासात उलगडण्यात पोलिसांना यश आलं. डायमंड कटिंगसाठी वापरली जाणारी काच आणि मयत व्यक्तीच्या फोन कॉल रेकॉर्डवरुन पोलिसांनी आरोपीला शोधलं. आपला फोन कोणीतरी खेचत असल्याचं त्याने अखेरीस पत्नीला सांगितलं, आणि हाच दुवा महत्त्वाचा ठरला. (Dahisar Murder Mystery Solved)
पश्चिम दृतगती महामार्गावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत सापडल्याची माहिती दहिसर पोलिसांना 23 फेब्रुवारीला रात्री बारा वाजता मिळाली होती. संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
37 वर्षीय अशोक मौर्य यांच्या हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. दहिसर पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपास लावलेले सीसीटीव्ही आणि मयत व्यक्तीचा फोन रेकॉर्ड तपासला असता, तो पत्नीशी फोनवर बोलत असल्याचं समोर आलं. फोनवर बोलता-बोलता आपला फोन कोणीतरी खेचत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं होतं.
हेही वाचा– वसईत दे दणादण! नवरा-बायकोच्या कुटुंबीयांची फ्री-स्टाईल हाणामारी
मद्यपान केल्यानंतर आरोपी अशोक मौर्यांकडील मोबाईल आणि पैसे हिसकावत होता. मात्र त्यांनी विरोध केल्यामुळे दोघांमध्ये झटापट झाली. अखेरीस बिंदूने मौर्य यांची दगडाने ठेचून हत्या केली. माहितीचा धागा पकडून पोलिसांनी 37 वर्षीय आरोपी बिंदू शर्माला थेट उत्तर प्रदेशातील कानपूरमधून उचललं.
सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती हत्येनंतर कानपूरला पसार झाल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी बिंदूला कानपूरमध्ये अटक केली आणि पुन्हा मुंबईला आणलं. (Dahisar Murder Mystery Solved)