सर्वात मोठी बातमी | उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवार यांच्या घरी, जाणूून घ्या भेटीचं कारण!
अजित पवार हे एकनाथ शिंदे गट यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपासोबत सरकारमध्ये सामील आहेत. यानंतर पहिल्यांदाच ते सिल्व्हर ओकवर जात असल्याने सर्वांची नजर लागून आहे. मात्र हे कारण कौटुंबिक असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या सौभाग्यवती आणि अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची शस्त्रक्रिया झाल्याने अजित पवार हे सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार हे एकनाथ शिंदे गट यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपासोबत सरकारमध्ये सामील आहेत. यानंतर पहिल्यांदाच ते सिल्व्हर ओकवर जात असल्याने सर्वांची नजर लागून आहे. मात्र हे कारण कौटुंबिक असल्याचं सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबतच्या मंत्र्यांना आज खातेवाटप झालं, या राजकीय घडामोडीत अजित पवार दिवसभर व्यस्त होते. अजित दादा आणि प्रतिभा पवार यांची भेट कौटुंबिक असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे देखील आई प्रतिभा पवार यांच्या तब्येतीमुळे राजकीय वर्तुळात सक्रीय नसल्याचं दिसून येत आहे. सुप्रिया सुळे यांनी मागील आठवड्यापासून कोणतंही राजकीय ट्ववीट केलेलं दिसत नाही.अजित पवार हे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी शरद पवार यांचा मात्रा याला अजिबात पाठिंबा नाही. शरद पवार यांनी हे आधीच स्पष्ट केलं आहे.
अजित पवार हे भाजपासोबत सरकारमध्ये गेले आहेत, या घटनेला काही दिवस फक्त झालेले आहेत, यावरुन ते आज सिल्व्हर ओकला गेल्याने अनेकांना आश्चर्य वाटतंय, मात्र ही भेट कौटुंबिक असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी देखील भाजपासोबत सरकारमध्ये सामील होताना, शरद पवार आजही आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी असल्याचं म्हटलं आहे. तर शरद पवार यांचे अनेक विश्वासू मानले जाणारे सहकारी अजित पवार यांच्यासोबत भाजपा सरकारमध्ये सामील होवून मंत्री झाले आहेत. अजित पवार यांच्या नव्या दालनात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आलेला आहे.अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार देण्यात आलेला आहे. तर अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांची गळचेपी होईल, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झाली आहे.