‘तो’ एक मुद्दा एवढा महागात पडेल वाटलं नव्हतं? अजित पवारांनी सांगितलं लोकसभेमध्ये कुठे फटका बसला
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊनही लोकसभेमध्ये महायुतील यश आलं नाही. लोकसभेला कुठे नेमका फटका बसला यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा तर अजित पवार गटाती जनसन्मान यात्रा सुरू आहे. आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात काही यश मिळालं नाही. महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या होत्या. अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कशामुळे फटका बसला? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
संविधान बदलण्याचा मुद्दा एवढा महागात पडेल असं वाटलं नव्हतं. थोडी जाणीव होती, पण एवढा फरक पडेल असं वाटत नव्हतं. बिहारमध्ये हे झालं नाही. मध्यप्रदेशात झालं नाही. अपप्रचाराचा तिथे परिणाम नाही झाला. चंद्राबाबू नायडू, शिवराज चौहान आणि नितीश कुमार, चिराग पासवान सोबत होते. लीडरशीप तिथे स्ट्राँग होती त्यामुळे त्यांनी निवडणुकीत प्रचार केला पण आम्ही महाराष्ट्रात कमी पडलो. आघाडी सरकारमुळे नाही, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही पूर्ण प्रयत्न केला होता. पण संविधान बदलण्याचा आणि आरक्षण जाण्याचा मुद्दा लोकांच्या मनातून काढला गेला नाही. लोकांना ते खरं वाटलं. त्यामुळे आमच्यापासून मतदार दुरावला. सीएए कायद्याबाबत अपप्रचार झाला. आपल्या देशाच्या बाहेर राहणाऱ्या भारतीयांना आणण्यासाठी सीएए कायदा आणला होता. देशाच्या बाहेर20-25 वर्ष राहणाऱ्यांना देशात आणण्यासाठी कायदा नव्हता. पण मायनॉरिटीला वाटलं आपल्याला देशातून हाकलून देण्यासाठी हा कायदा आला आहे, असं वाटलं. आपल्याला हटवून दुसऱ्यांना आत घेणार आहेत, असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे अल्पसंख्याक भयभीत होते, अजित पवारांनी सांगितलं.
सुमित्रा पवारांना उभं करणं चुकलं- अजित पवार
माझ्या मनात जे येतं ते मी बोलतो. मी 35 वर्षापासून राजकारणात आहे. मला कुणी तरी विचारलं. मी निवडणुकीनंतर बराच विचार केला. हे कसं झालं? का झालं? त्याला मीच जबाबदार आहे. मी कुणाला दोष देत नाही. मला असं नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे मी बोललो. कुटुंबासाठी माझा निर्णय चुकीचं होतं. आमचे आजी आजोबापासून आम्ही सर्व एकत्र राहतो. त्यामुळे माझ्या मनात आलं. कुटुंबा कुटुंबात जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो तरी कोणी तरी हरणार होतं. जिंकणारं आणि हरणारे कुटुंबातीलच होते. कुटुंबातील लोकांना त्रास होत होता. त्यामुळे मी बोललो,असं अजित पवार म्हणाले.