दीपक केसरकर यांनी युवा नेत्याचा कॉमनसेन्स काढला; म्हणाले, एवढा…
भारतातील राज्यांनी अनेक असे निर्णय घेतले आहेत की त्यामुळे ही राज्य दिवाळखोर होणार आहेत. त्यामुळे मतांचे राजकारण करायचं की हिताचं राजकारण करायचं हे त्या त्या राज्याने ठरवायचं असतं.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार टीका केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांना भारताशी करार करायचा असतो अन् तो दावोसलाच होतो. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना एवढा कॉमनसेन्स नसेल तर अवघड आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांचं नाव न घेता केली आहे. केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली आहे.
युवकांना मॅच्युरीटी असली पाहिजे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री चार्टड फ्लाइटने गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. पंतप्रधानांचा दौरा असताना ही टीका करणं चुकीचं आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.
ती कंपनी काय आंतरराष्ट्रीय होती का?
मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केले, त्या कंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरही केसरकर यांनी उत्तर दिलं. त्यांनी जेव्हा दावोसला जाऊन करार केले, तेव्हा त्यांच्यावेळी महिंद्रा कंपनी होती. ती काय आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनी आहे का?, असा सवाल केसरकर यांनी केला.
प्रवक्ता नेमा
कंपनी राज्यातील असली तरी त्यात परदेशी गुंतवणूक असते. परदेशी गुंतवणूकदारांना भारताशी करार करायचा असतो. तो दावोसला होतो. एवढा साधा कॉमनसेन्स रुणाला नसेल तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांच्याबद्दल आदर आहे. पण माहिती घेण्यासाठी त्यांनी किमान प्रवक्ता नेमावा, असा चिमटाही त्यांनी काढला.
मोदी इंटरनॅशनल फिगर
मुंबईत असताना परदेशी शिष्टमंडळाला भेट नाकारणारे मुख्यमंत्रीही होऊ गेलेत. तसेच 76 तासांमधील 72 तास काम करणारे मुख्यमंत्रीही होऊन गेले. त्यांच्यावर टीका का करता? पंतप्रधान मोदी ही इंटरनॅशनल फिगर आहेत. त्यांच्याबद्दल लोक विचारणारच ना? त्यात एवढं मोठं काय? तुमच्या राज्यात सत्ता कुणाची आहे? असं बाहेरच्या पंतप्रधानांना जाणून घ्यायचं असतं, असंही ते म्हणाले.
दिवाळखोर होणार
भारतातील राज्यांनी अनेक असे निर्णय घेतले आहेत की त्यामुळे ही राज्य दिवाळखोर होणार आहेत. त्यामुळे मतांचे राजकारण करायचं की हिताचं राजकारण करायचं हे त्या त्या राज्याने ठरवायचं असतं, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र मोठा आहे. राज्यात पंतप्रधानांचा दौरा होता.
त्यामुळे मुख्यमंत्री चार्टड फ्लाईटने मुंबईत आले. प्रत्येक दौऱ्याची आणि खर्चाची सरकार दरबारी सर्व नोंद असते. सरकारचं ऑडिट स्ट्रिक्ट असतं. ज्यांना अनुभव नाही, परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असं बोलत असतात, असा टोला त्यांनी लगावला.
थोडा संयम राखा
थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नका. डोक्यात एवढा राग घेऊ नका. थोडं शांत व्हा, असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.
कारवाई होईल
यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर प्रकरणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकरण घडलेलं असेल तर गृहविभाग त्यावर कारवाई करेल. आम्हाला आमदार आणि इतर सर्व सारखेच आहेत. बांगर साहेबांशी चर्चा करू. त्यांनी संयम राखला पाहिजे. सरकारची इमेज राखली पाहिजे. बांगर हे अग्रेसिव्ह आहेत. पण कॉस्टसाठी भांडत असतात, असं त्यांनी सांगितलं.