विद्यार्थांना शस्त्र प्रशिक्षण दिल्याप्रकरणी बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेत बजरंग दलाकडून शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आल्याचा आरोप डेमॉक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी डिवायएफआय संघटनेने दोषींवर कारवाईची मागणी करत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आंदोलन करणाऱ्या संघटनेने बजरंग दल आणि […]
मुंबई : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेत बजरंग दलाकडून शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आल्याचा आरोप डेमॉक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी डिवायएफआय संघटनेने दोषींवर कारवाईची मागणी करत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
आंदोलन करणाऱ्या संघटनेने बजरंग दल आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा मागणी केली. त्यासाठी संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोडच्या नयानगरमध्ये आंदोलनही केले. या आंदोलनात आम आदमी पक्ष (AAP) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेत बजरंग दलाच्या मुलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी संबंधित आंदोलनकारी संघटनांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
डीवायएफआय संघटनेने नवघर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, “मीरा रोडवरील सेवन इलेव्हन अकॅडमी या शाळेत बजरंग दलाकडून मुलांना बेकायदेशीर शस्त्र प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षण देण्यात आलेल्या मुलांमध्ये काही अल्पवयीन विद्यार्थीही होते. त्यांच्यासाठी ही शस्त्रे हाताळणे धोकादायक होते.” याबाबत बजरंग दलाशी संबंधित प्रशांत गुप्ता नावाच्या व्यक्तीने एक फेसबुक पोस्टही केली होती. त्यात शस्त्र प्रशिक्षणाचे अनेक फोटो देण्यात आले होते. तेही पोलिसांना सादर करण्यात आल्याचे डीवायएफआयने सांगितले आहे.
बजरंग दलावर अनेक हिंसक घटनांमध्ये सहभागी झाल्याचे आरोप आहेत. याच संघटनेने 25 मे ते 1 जून दरम्यान संबंधित शस्त्र प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला. यावर आक्षेप घेत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी सांगितले, “या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. शस्त्र प्रशिक्षण आयोजित करणाऱ्यांना विचारले असता त्यांनी या प्रशिक्षणासाठी परवानगी घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्याकडे संबंधित परवानगीची कागदपत्रे मागण्यात आली आहेत. ती तपासून त्यात चुकीचं आढळल्यास कारवाई केली जाईल.”