अजित पवार इन अॅक्शन; रुग्णालयांच्या फायर ऑडिटपासून म्युकोरमायकोसिस औषधांबाबत बैठकीत आढावा
राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तातडीने करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (Ajit Pawar Meeting on Corona Mucormycosis)
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देताना कोरोनाबाधितांच्या संपर्कात असणाऱ्या हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या कोरोना चाचणीवर भर द्यावा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरोमायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या 131 रुग्णालयांची यादी प्रसिध्द करावी. त्याशिवाय राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तातडीने करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (Deputy CM Ajit Pawar Meeting Regarding Corona Mucormycosis in Maharashtra)
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.
?अजित पवारांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
➡️राज्यातील शहरी भागातील कोरोना संसर्ग कमी होत असताना ग्रामीण भागातील संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा.
➡️ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी सरसकट चाचण्या कराव्यात. तसेच कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी आशा वर्करना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत चाचण्या कराव्यात.
➡️ग्रामदक्षता समित्यांना अधिक क्षमतेने कार्यान्वित करावे. कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती औजारांची दुकाने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरु ठेवण्याचे नियोजन करावे.
➡️म्यूकरोमायकोसिसच्या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार सुरु केल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे या रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरु करण्यात यावेत. त्यामुळे या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही.
➡️म्युकर मायकोसिसच्या औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी म्युकर मायकोसिस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे.
➡️हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात म्युकर मायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. तसेच ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या औषधांची उपलब्धता आपल्याला होणार आहे.
➡️त्यामुळे पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल. मात्र रेमडीसीव्हीर प्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच या औषधांचे योग्य आणि प्रभावीपणे वितरण करावे.
➡️कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा कोविड सेंटर उभारावे.
➡️तसेच लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवावी.
➡️राज्यात सुरु असणाऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीला गती द्यावी.
➡️तसेच प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन वापराचे योग्य नियोजन करण्यात यावे.
➡️त्याशिवाय खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करावी. त्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांच्या बिलाची तपासणी करण्यात यावी. (Deputy CM Ajit Pawar Meeting Regarding Corona Mucormycosis in Maharashtra)
संबंधित बातम्या :
“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा घणाघात
कोरोनाग्रस्तांसोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?