मग उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वच चोर ठरतो; देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना खडसावले

| Updated on: Mar 01, 2023 | 1:05 PM

काय निर्णय घ्यायचा तो घ्या. मी काहीच मागणी करणार नाही. पण सरकार म्हणून मी लोकांच्या भावना समजून घेतो. व्यक्ती कोणीही असो आमच्या पक्षातील असला तरी विधानमंडळाचा अपमान खपवून घेणार नाही हा संकेत दिला पाहिजे.

मग उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वच चोर ठरतो; देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना खडसावले
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : विधिमंडळ नव्हे चोर मंडळ असं विधान करणं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलंच भोवणार असल्याचं दिसतं. या विधानाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर विधान परिषदेतही या विधानाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. राऊत यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला. संजय राऊत आम्हाला चोर मंडळ म्हणत आहेत. उद्धव ठाकरे हे याच सभागृहाचे सदस्य आहेत. मग आम्ही सर्वच चोर ठरतोय काय? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या विधानावरून जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील विधानमंडळ देशातील सर्वोत्तम विधान मंडळ म्हटलं जातं. पण विधान मंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार दिला तर मग या विधानमंडळावर कुणाचा विश्वास राहणार नाही. आपल्याला हक्कभंग आयुध दिलं कशासाठी? न्यायालयाच्या विरोधात बोलल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं. उद्या आपल्या बाजूने न्याय नाही आला म्हणून कुणी कोर्टाविरोधात बोललं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो. तसेच विधान मंडळावर कोणी काही बोलू नये म्हणून हक्कभंगाची व्यवस्था केली आहे, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं.

हे सुद्धा वाचा

कुणाचंही समर्थन केलं जाऊ शकत नाही

कुणाच्याही चुकीच्या बोलण्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. कुणी गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारणं योग्य नाही. हा प्रश्न विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांचा नाही. विधान मंडळ म्हटल्यानंतर तुमचे नेते उद्धव ठाकरे याच विधान मंडळाचे सदस्य आहेत. मग आम्ही सर्व चोर मंडळाचे सदस्य ठरतो. त्यांनी तसं क्लिअर म्हटलंय. नुसतं चोर मंडळ नाही. गुंड मंडळ म्हटलं. आम्ही गुंड आहोत काय? असा सवाल राऊत यांनी केला.

ते साधे नेते नाहीत

ते साधे नेते नाहीत. राज्यसभेचे सदस्य आहेत. मोठ्या सभागृहाचे नेते असं करत असतील तर कसं सहन करणार? हक्क भंग घ्यायचा असेल तर घ्या नाही तर नका घेऊ. अटक करण्याची मागणी असेल तर त्यावर काय करायचं ते करा. मी बोलणार नाही. तो तुमचा अधिकार आहे. पण आपण निषेध नोंदवला नाही तर उद्या हजारो संजय राऊत विधान मंडळाला चोर म्हणतील. आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून या विधानंमडळाचा कंटेम्प्ट करतील, असं ते म्हणाले.

काय घ्यायचा तो निर्णय घ्या

काय निर्णय घ्यायचा तो घ्या. मी काहीच मागणी करणार नाही. पण सरकार म्हणून मी लोकांच्या भावना समजून घेतो. व्यक्ती कोणीही असो आमच्या पक्षातील असला तरी विधानमंडळाचा अपमान खपवून घेणार नाही हा संकेत दिला पाहिजे. विधानमंडळाचा घोर अपमान झालाय. राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करतो. मी निषेध करतो. अशा प्रकारच्या व्यक्तीवर काय कारवाई केली पाहिजे हे जनता पाहता आहे, असं ते म्हणाले.