खासदार कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी
भिवंडीत खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला
भिवंडी : मुख्यमंत्रिपदी असताना किंवा आता विरोधीपक्ष नेतेपद भूषवताना देवेंद्र फडणवीस यांना जाहीर सभा आणि विधीमंडळात तूफान शाब्दिक फटकेबाजी करताना सर्वांनीच पाहिलं आहे. मात्र भिवंडीतील मैदानात फडणवीसांना हातात बॅट धरुन फलंदाजी करताना पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली. खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस सोहळ्यात फडणवीसांनी कपिल पाटलांच्याच गोलंदाजीवर बॅटिंग केली. (Devendra Fadnavis batting Bhiwandi)
भिवंडीतील अंजुरमध्ये ‘सिद्धिविनायक क्रिकेट क्लब’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी फडणवीसांनी ई-बाईक सेवेचा शुभारंभही केला. तर आयोजकांच्या वतीने देवेश पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांदीची तलवार देत सन्मानित केलं.
देवेंद्र फडणवीसांनी कपिल पाटील चषक स्पर्धेतील भव्यदिव्य बक्षिसांची प्रशंसा केली. 26 बाईक्स इतकी बक्षीसं राज्यात नव्हे, तर देशात सर्वाधिक असल्याचा दावा करत या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडू निर्माण होवोत, अशा शुभेच्छाही दिल्या.
आम्ही केलेल्या कामाचे श्रेय कोणी घेऊ शकत नाही. कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करत असलं, तरी जनता सुज्ञ आहे. ती प्रत्येकाचे माप ज्याच्या-त्याच्या पदरात टाकते, असे शाब्दिक फटकेही देवेंद्र फडणवीस यांनी लगावले. आमच्या विकासाच्या रेषेपेक्षा मोठी रेषा मारा, आमची रेषा मिटवू नका, अन्यथा जनता तुम्हाला मिटवून टाकेल, असा इशाराही फडणवीसांनी दिला.
विकास कोणीही थांबवू शकत नाही. दिल्लीमध्ये मोदींचे राज्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खंबीर राहावं. आपल्या जिल्ह्याचा विकास आम्ही केंद्राच्या माध्यमातून करु, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी खासदार कपिल पाटील यांना शुभेच्छा देताना व्यक्त केला. (Devendra Fadnavis batting Bhiwandi)
हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळविल्याचा आरोप, फडणवीसांना हायकोर्टाची नोटीस