का बिच्चाऱ्या अंबादास दानवेंना…. दानवे, अमित देशमुखांच्या पक्षप्रवेशाबाबत फडणवीस यांचं विधान काय ?
काँग्रेसला आज प्रचंड मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शेकडो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना नेते अंबादास दानवेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. दानवे हे भाजपमध्ये जाऊन संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे. चंद्रकांत खैरे हे माझे नेते असून त्यांचा प्रचार मी सुरू केला आहे, असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अंबादास दानवे भाजपमध्ये येणार नसल्याचं स्पष्ट केलं. दानवेच काय अमित देशमुखही भाजपमध्ये येणार नाही. विरोधी पक्षात असले म्हणून कोणत्याही नेत्याला उगाच संशयाच्या फेऱ्यात आणणं योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिलं. अंबादास दानवेशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांच्या प्रवेशाची चर्चा नाही. का बिच्चाऱ्या अंबादास दानवेंना परेशान करत आहात? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला केला.
आज तरी भूकंप नाही
आम्ही ऑपरेशन केलं ना तर तुम्हाला कळत नाही. तुम्हाला कळलं तर ते ऑपरेशन नाही. आम्ही जो भूकंप करणार आहोत असं तुम्ही सांगत आहात, तो कोणता भूकंप आहे ते तरी आम्हाला सांगा. असा काही भूकंप होणार हे आम्हालाच माहीत नाही. तुमच्याकडूनच ऐकतोय. तुम्ही मराठवाड्यातील त्या नेत्याचं नाव सांगा. आम्ही त्याचा पिच्छा करू, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. निवडणूक काळात ऑपरेशन, भूकंप होत असतात. पण आजतरी कोणताही भूकंप होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
देशमुख संपर्कात नाही
काँग्रेस नेते अमित देशमुख माझ्या संपर्कात नाही. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा नाही. विरोधक जरी असला तरी त्यांना संशयाच्या फेऱ्यात आणणं योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.
चार पाच जागांवर अडलंय
यावेळी त्यांनी महायुतीतील जागा वाटपावरही भाष्य केलं. आमचं चार पाच जागांवर अडलेलं आहे. एक जागा अडली तर तीन जागा अडल्या जातात. फार अडलंय असं नाही. थोडं अडलं आहे. तो तिढा आज उद्या सुटेल, असं सांगतानाच धाराशीवच्या जागेबाबत महायुतीच्या स्थानिक नेत्यांनाच निर्णय घेण्यास सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.
त्यांच्या फ्रेंडली फाईट
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. महाविकास आघाडी असो की इंडी आघाडी असो यात फ्रेंडली फाईट सुरू आहे. चार महिन्यांपासून ते फ्रेंड म्हणून बसतात आणि नंतर फाईट करतात हेच चित्र दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.