Tv9 EXCLUSIVE | अजित पवार यांना सत्तेत सहभागी करणं हा भाजपचा बी प्लान? देवेंद्र फडणवीस यांची सर्वात स्फोटक मुलाखत

| Updated on: Oct 28, 2023 | 7:34 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. काही घडामोडी या समोर घडताना दिसत आहेत. तर काही घडामोडी पडद्यामागे घडत आहेत. या सर्व घडामोडी कुठपर्यंत जातील ते येणाऱ्या काळात बघायला मिळेल. पण भाजपचा आगामी काळासाठी राज्यातील राजकीय घडामोडी पाहता काही बी प्लान तयार आहे का? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय.

Tv9 EXCLUSIVE | अजित पवार यांना सत्तेत सहभागी करणं हा भाजपचा बी प्लान? देवेंद्र फडणवीस यांची सर्वात स्फोटक मुलाखत
Follow us on

मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. याशिवाय ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत असताना अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं, असा भाजपचा बी प्लान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. याबाबतच्या सर्व चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या रोखठोक या विशेष कार्यक्रमात भूमिका मांडलीय. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली.

“ज्याला कोर्ट समजतं. कोर्टाची ऑर्डर समजते. ज्याने सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचली असेल, ज्याने निवडणूक आयोगाची ऑर्डर वाचली असेल तो शंभर टक्के सांगेल एकनाथ शिंदे डिस्क्वॉलिफाय होणार नाहीत. अर्थात केस विधानसभा अध्यक्षांकडे सुरू आहे. निर्णय काय घ्यायचा हे ते ठरवतील. यापेक्षा अधिक कमेंट सांगण्याचं कारण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘कोणी डिस्क्वॉलिफाय झालं तरी अडचण नाही’

“एका मिनिटासाठी हायपोथेटिकल सांगतो. समजून चला शिंदेंना डिस्क्वॉलिफाय केलं तरी मुख्यमंत्री राहू शकतात. काय अडचण आहे का नाही. विधान परिषदेवर येतील.अडचण काय तरीही ते डिस्क्वॉलिफाय होतच नाही. शिंदे डिस्क्वॉलिफाय होतील? आमची संख्या अशी आहे कोणी डिस्क्वॉलिफाय झालं तरी अडचण नाही. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत काम केलं आहे. कुठेही तसूभरही कायद्याची चौकट मोडली नाही. विचारपूर्वक नियमात बसून केलंय. त्यामुळे आम्हाला भीती नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

“डिस्क्वॉलिफिकेशनच्या बातम्या चालवल्या जातात ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्ष एकत्र ठेवायचा आहे. त्यामुळे लोकांना आशा दाखवायचे आहे. त्यामुळे ते आशा दाखवत आहेत. ही भाबडी आशा आहे. पण त्यांच्याही लोकांच्या लक्षात आलंय, काहीच होणार नाही. हे सरकार पूर्णकाळ चालणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपचा बी प्लान काय?

“भाजपला बी प्लानचा गरज नाही. फक्त ए प्लान आहे. शिंदेच मुख्यमंत्री राहतील. ते अपात्र ठरणार नाहीत. त्याची आम्हाला खात्री आहे. आम्ही कायद्याचा अभ्यास केला आहे. त्यामुळे शिंदेच मुख्यमंत्री राहतील. अजितदादा ब्ली प्लान नाहीत. अजितादादांना बोललात तरी हेच सांगतील. त्यांना शंभर टक्के क्लेरिफाय करून सांगितलं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील, ते मान्य करूनच ते आमच्यासोबत आले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. तो पूर्ण केला. मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील”, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

“ते पहिल्याच सभेत मलाही मुख्यमंत्री व्हायचं असं म्हणाले असले तरी त्याला काय अडचण आहे. अजितदादा अनुभवी नेते आहेत. ते सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे महाराष्ट्राबाबत स्वप्न असू शकतात. ते मॅच्युअर्ड नेते आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी किती लोक तुमच्यासोबत आहेत त्यावर मुख्यमंत्रीपद ठरतं हे त्यांनी सांगितलं”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.