मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात (Anvay Naik) का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला. (Anvay Naik family accusations on Devendra Fadnavis)
अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. मात्र, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भाजपने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांना मनसुख हिरेन प्रकरणात गुप्तचर यंत्रणांकडून CDR दिला जातो. मग आम्हाला तसा CDR का मिळाला नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या मुलीने केला. आमच्या प्रकरणात ईमेल आणि सुसाईड नोट मिळाली होती. मग तरीही आम्हाला न्याय का मिळाला नाही, असा सवाल नाईक यांच्या मुलीने उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आमचे बिलकूल ऐकून घेतले नाही, आम्हाला दाद दिली नाही, असा थेट आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला. आशियातील श्रीमंत व्यक्तीला ज्या वेगाने न्याय मिळतो तसाच न्याय आमच्यासारख्या सामान्य माणसांना मिळणार नाही का, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नीने उपस्थित केला.
एखाद्या प्रकरणाचा निकाल विधानसभेतच लावायचा असेल तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालायाची गरजच काय, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला. त्यांचा रोख मनसुख हिरेन प्रकरणाच्या दिशेने होता. मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळ फासलं गेलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र, ते विधानसभेत खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरापासून 400 ते 500 मीटर अंतरावर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यावर सर्व यंत्रणा सक्रिय होतात. पण आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, त्यावर फडणवीस सरकारच्या काळात कोणतीही कारवाई झाली नाही. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या कमेंट सोशल मीडियावर करण्यात आल्या. या प्रकरणातील आरोपी त्याच्या चॅनेलवरुन खुलेआम आम्हाला धमक्या देतो. मग महिला दिनाच्या दिवशी स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यात काय अर्थ आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला.
(Anvay Naik family accusations on Devendra Fadnavis)