अजित पवार यांना भीती होती, त्याचीच फडणवीसांनी केली उघडपणे पोलखोल?
यामुळेच अजित पवार पहाटेच्या शपथविधीबाबत बोलणं कायम टाळत तर नव्हते ना?, देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे ओळखले जातात. सभा असो वा कोणता कार्यक्रम दादा कधी कोणाला धारेवर धरतील याचा काही नेम नाही. विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला ते उत्तर देणं टाळत नाहीत. मात्र अजित पवारांना गेल्या दोन वर्षात विचारला गेलेला एक प्रश्न दादा नेहमी टाळताना दिसले. ज्या-ज्या वेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवारांनी मी सांगितलंय ना वेळ आली की यावर बोलेल, इतकंच दादा बोलायचे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी टीव्ही9 मराठीला मुलाखत दिली होती. त्यावेळी देखील त्यांनी शपथविधीच्या प्रश्नावर बोलणं टाळलं होतं. मी काय तुम्हाला मुर्ख वाटलो का असं म्हणत संताप व्यक्त केला होता. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
राष्ट्रवादी आणि भाजपने सत्ता स्थापन करत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला होता. पहाटेच्या वेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांनी बंड केलं मात्र त्यांचं हे बंड फार काही काळ टिकलं नव्हतं, अवघ्या काही तासांमध्ये सरकार पडलं होतं. कारण अजित पवार यांचं बंड फसलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीने आपलं सरकार स्थापन केलं होतं. मात्र या सत्तानाट्याबाबत सर्व काही गुपित राहिलं होतं.
अजित पवार यांना भाती होती तेच झालं का?
देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केलाय. भाजप आणि राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या सरकारबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचा असाही अर्थ लावला जात आहे की यामुळेच अजित पवार पहाटेच्या शपथविधीबाबत बोलणं कायम टाळत तर नव्हते ना? इतकंच बोलून देवेंद्र फडणवीस थांंबले नाहीत. यावेळी बोलताना फडणवीसांनी अजित पवार यांना इशाराही दिला आहे. अजित पवार अजून काही बोलले तर आणखी गौप्यस्फोट करेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अजित दादा आमच्याकडे आले होते किंवा त्यांनी माझ्याबद्दल शपथ घेतली होती ती फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती ही गोष्ट सांगावी लागेल. त्यामुळे त्यांच्याकडे ठरल्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या, ते कसे तोंडघशी पडले हे ते सांगतील. त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.