महाविकास आघाडी मतांचं ‘वोट जिहाद’ करतंय. आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास ‘धर्मयुद्ध’ करावंच लागेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत म्हटलं. फडणवीसांच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतला. धर्मयुद्ध म्हणून फडणवीस दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता आज tv9 मराठीच्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या विधानाला उत्तर दिलं आहे. सज्जाद नोमानी यांच्या विधानावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी ‘धर्मयुद्ध’ शब्दावर आक्षेप घ्यावा. मी त्यांना खुलं आव्हान देतो. उद्धव ठाकरेजी, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. माझ्या ‘धर्मयुद्ध’ शब्दावर तुम्ही आक्षेप घ्या. मला माहिती आहे. तुम्हाला ‘जिहाद’ शब्द आवडतो. तुम्हाला ‘धर्मयुद्ध’ शब्द आजकाल आवडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
सज्जाद नोमानी यांनी दंगलींमधील मुस्लीम लोकांवरचे खटले मागे घ्यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं जे भाजपला मदत करतात त्यांना सोशल बायकॉट करा. या दंगली नाहीयेत? यावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? कारण आता ते हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र राहिलेले नाहीत. ते जनाब बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र झालेले आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवी यांनी निशाणा साधला आहे. सज्जाद नोमानीचं पाय चाटणं जे सुरु आहे. त्याला आमचा विरोध आहे, असं फडणवीस म्हणालेत.
लोकसभेसारखं विधानसभेला देखील अल्पसंख्याकांमध्ये जिहाद हा शब्द वापरून, धार्मिक नेत्यांचा वापर करून मशीदींचा वापर करून हे पुन्हा एकदा मतांचं ध्रुवीकरण करत आहेत. अशावेळी आमचं कर्तव्य आहे की इतरांना आम्ही सजग केलं पाहिजे. कारण मूठभर लोकांचे चोचले पुरवून एखादं सरकार निवडून आलं. तर ते सरकार त्यांच्या करताच काम करेल. त्यांच्याच इशाऱ्यावर नाचेल, असं म्हणत सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.