देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे गटाला करारा जवाब; फडणवीस म्हणाले, यांची दुकानदारी…
आमच्याच विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ही झोपेत बोलणारी लोकं आहेत.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेची भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. या सभेला तब्बल दीड लाख लोक येणार असल्याची माहिती आहे. यावेळी येणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसीवर जाऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. तसेच संपूर्ण तयारीचा आढावा घेतानाच सुरक्षेचाही आढावा घेतला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.
लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर उद्या बीकेसी मैदानावर येईल अशी शक्यता आहे. उद्याचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे कार्यक्रम होईल. येणाऱ्या नागरिकांची अव्यवस्था होणार नाही याची काळजी घेत आहोत. या संदर्भात पोलिसांशी चर्चा केली, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान कोणत्या मार्गाने येणार हे जाहीरपणे सांगायचं नसतं, असंही स्पष्ट केलं.
तर दुकानदारी बंद होईल
रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावरही त्यांनी पलटवार केला. ज्यांची हयात घोटाळे करण्यात झाली. त्यांना दु:ख होत आहे. काँक्रिटचे रस्ते केले तर 40 वर्ष रस्तेच होणार नाही. त्यामुळे यांची दुकानदारी बंद होईल. यांची दुकानदारी बंद करण्याचे काम हे काँक्रिटचे रस्ते करत आहेत. त्यामुळे त्यांची ओरड सुरू आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
रस्त्यांचे लेअरच गायब होते
मी मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या रस्त्यांची चौकशी झाली होती. त्यावेळी 200 रस्त्यांच्या खालील लेअरच गायब होती. ते आम्हाला रस्त्यांच्या मुद्द्यावरून बोलत आहेत. त्यांचा भ्रष्टाचार उखडून टाकण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत, असंही ते म्हणाले. पारदर्शक पदधतीने टेंडरींग केलं आहे.
जे आरोप लावले आहेत. त्याचं उत्तरही महापालिकेने दिले आहे. कोणत्या किंमतीत रस्ते होत आहेत यांचं दु:ख यांना होत नाहीये. तर त्या रस्त्यांमुळे यांची दुकानदारी बंद होईल, हेच यांचं दु:ख आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राऊतांच्या आरोपांवर प्रत्युत्तर
आमच्याच विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ही झोपेत बोलणारी लोकं आहेत. मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं.
मेट्रोचं उद्घाटनही पंतप्रधान करत आहेत. टक्केवारी ठरली नाही म्हणून त्यांनी रस्त्याचे टेंडर काढले नाही. टक्केवारी ठरत नव्हती म्हणून टेंडर निघत नव्हते. आम्ही मात्र, वर्क ऑर्डर दिले. यांना क्लेम करण्याचा अधिकारच नाही. यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी 15 वर्ष रस्तेच झाले नसते, असा चिमटाही त्यांनी काढला.
त्या बाबत माहीत नाही
विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्रं लावण्यात येणार आहे. या तैलचित्रं अनावरणाच्या कार्यक्रमपत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव नाही. तसेच उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हा कार्यक्रम विधान मंडळाचा असतो. सरकारचा नसतो. त्यामुळे त्याबाबत मला अधिक माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.