अजित दादांना घेऊन 2019 चा बदला घेतला का? देवेंद्र फडणवीस थोडक्यात पण खूप काही बोलले
Devendra Fadnavis : पहाटेचा शपधविधी फसला हे तेव्हा महाराष्ट्रातील बारकल्या पोरालाही समजलं होतं. त्यानंतर मविआची स्थापना आणि सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावं लागल्याचं महाराष्ट्राने पाहिलं होतं. मविआ सरकारचे शिल्पकार शरद पवार ठरले होते. आता दादांना सोबत घेत तेव्हाचा बदला घेतला का? यावर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील 2019 मधील सत्तानाट्य सर्वांनी पाहिलं, तेव्हाचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपसाठी हा मोठा धक्का होता, यादरम्यान अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेशपथविधी केल्यानेही खळबळ उडाली होती. मात्र हे सरकार अवघे 72 तास टिकलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आयत्यावेळी राष्ट्रवादीनेही भूमिका बदलल्याने भाजप तोंडावर पडली होती. मात्र आता 2024 ला सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये बसलेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना टीव्ही9 मराठीच्या लोकसभा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये दादांना सोबत घेत बदला घेतला का असा सवाल करण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहा काय उत्तर दिलं.
देवेंद्र फडणीस काय म्हणाले?
मी स्वत:ला चाणक्य समजत नाही. शरद पवार असतील. मी नाही. कोणी जर धोका दिला, विश्वासघात केला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. राजकारणात अपमान होतात. सहन करता येतात. विश्वासघात सहन करायचा नसतो. पण बदला घेतला असं म्हणणार नाही. संधी मिळाली तर फायदा घेतला पाहिजे. हे राजकारणात शिकलो. पोएटीक जस्टीस, कालचक्र आहे. कराल तसं भरावं लागतं. मी ईश्वरावर भरोसा ठेवणारा आहे. विश्वासघात होतो तेव्हा कालचक्र उत्तर देतो. मी उत्तर दिलं नाही, कालचक्राने दिल्याचं देवेंद्र फणडवीस म्हणाले.
राजकारणात असं होतं. पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावे लागले. अनेक संघर्ष पाहावे लागले. पवारांनी अनेक संघर्षांना आशीर्वाद दिले. हे कालचक्र आहे. काहीच नाही दुसरं, कालचक्रच.पर्व असं काही मानत नाही. पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. एक काळ गाजवला आहे. आजही ते संघर्ष करत आहेत. आज लोकांना देशात एकच नेतृत्व मोठं वाटतं. आश्वासक वाटतं. ते म्हणजे मोदींचं आहे. मोदींवर लोकांचा विश्वास असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.