Rajya Sabha Election 2022 : मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे, राज्यसभेतल्या विजयी सभेत फडणवीसांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने आपल्याला कौल दिला होता. मात्र तुम्ही पाठीत खंजीर खुपसून बेईमानी केली. आता किमान ही सत्ता तरी नीट चालवा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
मुंबई : या निवडणुकीनंतर या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. आम्ही जिंकलो, ते हरले इथपर्यंत विषय सिमित नाही. मात्र महाराष्ट्राचा विकास थांबला आहे, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाला. त्यानंतर पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की केवळ आमच्याशी लढायचे म्हणून आमच्या काळातील प्रकल्प बंद केले. त्यामुळे या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी जीएसटी, पेट्रोल-डिझेल यावरूनही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
‘विमा कंपन्यांनाच फायदा’
शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला. मात्र त्याबद्दल हे सरकार बोलायला तयार नाही. आमच्या काळामध्ये भरलेल्या विम्यापेक्षा जास्त पैसे मिळाले तरीही हे लोक विमा कंपन्यांवर मोर्चे काढत होते. आज मात्र सगळे त्यांच्या घशात चालले आहे. यावर कोणीही बोलत नाही. शेतकऱ्याला मदत नाही. शेतमाल खरेदीची अवस्थआ वाईट आहे. वीजेचा तुटवडा, भारनियमन, प्रकल्प बंद यामुळे महाराष्ट्र मागे चालला आहे, अशी टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘किमान ही सत्ता तरी नीट चालवा’
बेईमानी करून राज्य घेतले असले तरी राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखे वागले पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचे घर पाड, त्याचे घर पाड. मी नशीबवान आहे, माझे मुंबईत घरच नाही. त्यांना सरकारी बंगल्यालाच नोटीस द्यावी लागेल, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. केवळ पदांकरता सरकार चालवायचे आणि आणि समाजातील एकाही घटकाचा विचार करायचा नाही, ही अवस्था अत्यंत खराब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने आपल्याला कौल दिला होता. मात्र तुम्ही पाठीत खंजीर खुपसून बेईमानी केली. आता किमान ही सत्ता तरी नीट चालवा. किमान दोन काम तरी व्यवस्थित करा, असे आव्हान त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले.