मुंबई: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौरा करणार आहेत. 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या काळात ते दौऱ्यावर असतील. विशेष गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधून प्रारंभ होईल. (Devendra Fadnavis visit heavy rain affected areas in Maharaashtra)
19 ऑक्टोबरला बारामतीमधून दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर ते कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा या परिसराचा दौरा करत उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्या दिवशी म्हणजे 20 तारखेला देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तर शेवटच्या दिवशी ते 21 हिंगोली, जालना आणि औरंगाबादचा दौरा करतील. या तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 किमीचा प्रवास करणार आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार 19 आणि 20 तारखेला मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. ते तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासूनच बारामतीमधून आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. यानंतर ते सोलापूर आणि इंदापूर परिसराची पाहणीही करणार आहेत. याशिवाय, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकणात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी जमिनीवर उतरून काम करायला सुरुवात केल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी दौरा करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
परतीच्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वेळ पडल्यास सरकार कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.
संबंधित बातम्या:
भल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश
ये दादा का स्टाईल है! बांधावर उभं राहून दादा म्हणाले, अजित पवारचाही मुलाहिजा बाळगू नका!
अतिवृष्टीनंतर शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर अजितदादा बारामतीत
(Devendra Fadnavis visit heavy rain affected areas in Maharaashtra)