Dhananjay Munde : पात्र असणं आणि जबाबदारी देणं यात अंतर, पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवरून धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंचे नाव चर्चेत आणले खरे, मात्र भाजपाने दोन राज्यसभा उमेदवारांची नावे घोषित केली. या चर्चेचा नंतर शेवट झाला. याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, की पक्ष काय तो निर्णय घेईल. मात्र निवडणूक लढवण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
मुंबई : पंकजा मुंडे (Pankaja Munde) सर्व पदांसाठी पात्र आहेत, असे म्हटल्यावर इतर कोणीही त्या जागेसाठी पात्र नाही, असे म्हणण्याचे काही कारण नाही. पण पात्र असणे आणि त्यांच्यावर जबाबदारी देणे यात अंतर आहे, असा टोला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून सध्या विविध पक्ष आणि त्यांचे राजकारण पाहायला मिळत आहे. यात राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीविषयी वक्तव्य केले. त्याला धनंजय मुंडे यांनी टोला लगावत टीका केली आहे. फडणवीस यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळणार, असे तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर पंकजा मुंडेंनी पक्ष निर्णय घेईल, तो मान्य असेल, असे म्हटले आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे सर्व पदांसाठी पात्र आहेत, असे म्हणतात. मात्र बोलून काहीच होणार नाही. पात्र असणे आणि जबाबदारी देणे यात खूप फरक आहे, अंतर आहे. हे अंतर कुठे अडचणीचे ठरू नये, एवढेच आहे. तसेच त्या सर्व पदांसाठी पात्र आहेत, याचा अर्थ इतर कोणीही पात्र नाही असे म्हणण्याचे कारण नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
पंकजा मुंडेंचे काय मत?
देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंचे नाव चर्चेत आणले खरे, मात्र भाजपाने दोन राज्यसभा उमेदवारांची नावे घोषित केली. या चर्चेचा नंतर शेवट झाला. याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, की पक्ष काय तो निर्णय घेईल. मात्र निवडणूक लढवण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, की ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्यासाठी आनंदच आहे, मलाही त्याचा आनंद आहे. पीयूष गोयल यांना तिकीट मिळणार, हे अपेक्षितच होते. तर आता राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. विदर्भाला यात संधी देण्यात आली आहे. अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यांना शुभेच्छा, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.