ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर
हे संपूर्ण प्रकरणच खळबळजनक असल्यामुळे सध्या प्रसारमाध्यमांकडून धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. | Dhananjay Munde
मुंबई: बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. रेणू शर्मा या महिलेने त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर धनंजय मुंडे हे सर्वांपासून दूर राहताना दिसत आहेत. फेसबुकवर दिलेले स्पष्टीकरण वगळता धनंजय मुंडे यांनी याप्रकरणात अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. (Dhananjay Munde visit Chitrakoot Bungalow in Malabar hill Mumbai)
हे संपूर्ण प्रकरणच खळबळजनक असल्यामुळे सध्या प्रसारमाध्यमांकडून धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. प्रसारमाध्यमांचा हा ससेमिरा टाळण्यासाठीच धनंजय मुंडे प्रत्येक ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेत आहेत.
गुरुवारी पहाटेदेखील मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.
बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे.
अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडल्याचे समजते. तत्पूर्वी बुधवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे आता नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?
धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?
नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य
(Dhananjay Munde visit Chitrakoot Bungalow in Malabar hill Mumbai)