डॉ. दिगंबर शिर्के शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी, राज्यपालांची घोषणा
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. शिर्केंच्या नियुक्तीची घोषणा केली.
मुंबई/कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. शिर्के शिवाजी विद्यापीठातील सांख्यिकी विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. शिर्केंच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. ( Dr. Digambar Tukaram Shirke is new Vice Chancellor of Shivaji University, Kolhapur)
डॉ.दिगंबर शिर्के यांचे मुळ गाव हातकंणगले तालुक्यातील वाठार वडगाव आहे. शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र विषयात एम.एस्सी, एम फिल, पीएच.डी केली. शिर्के यांनी संख्याशास्त्र विभागाचे विभागप्रमुख, कुलसचिव, प्र-कुलगुरू पदावर काम केले आहे. शिक्षण क्षेत्रातील 33 वर्षांचा त्यांना अनुभव आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अश्विनी कुमार नांगिया आणि राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ १७ जून रोजी संपला होता. त्यानंतर कुलगुरू पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
Shivaji University | शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा लांबणीवर? परिक्षा मंडळाकडून लवकरच निर्णय अपेक्षित
Kolhapur Corona Care | कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर
( Dr. Digambar Tukaram Shirke is new Vice Chancellor of Shivaji University, Kolhapur)