मुंबई : केंद्रीय सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नुकतीच नारायण राणेंवर अॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. लिलावती रुग्णालयातून नारायण राणेंना आज डिस्चार्ज मिळाला आहे. नारायण राणेंवरील शस्त्रक्रियेनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नारायण राणेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये ब्लॉक असल्याचे डॉक्टरांना आढळून आले होते. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया पार पडली. अॅन्जिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आता डिस्चार्ज दिला आहे.
नारायण राणे यांना दोन स्टेंट्सची म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या आणि रक्तवाहिन्या दाबल्या जाऊ नये म्हणून बसवला जाणाऱ्या जाळीसारख्या छोटा गोलाकार तुकड्याची गरज होती. अॅन्जिओप्लास्टी करून ती बसवण्यात आली. यात स्टेंट बसवण्यात आले, तर दुसरा स्टेंट नंतर बसवण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
नारायण राणेंवर याआधीही अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. 2009मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे नारायण राणेंच्या छातीत दुखत होते. त्यावेळी त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. ती शस्त्रक्रिया देखील लिलावती रुग्णालयातच करण्यात आली होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी नारायण राणेंची रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. काही महिन्यांपूर्वीच नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर राणे जबरदस्त फॉर्मला आले आहेत. त्यांनी शिवसेनेला घेरण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. तसेच आता राज ठाकरे यांनीही आगामी पालिका निवडणुकांआधी शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यानंतर राज ठाकरे यांचे कौतुक करताना राणे अनेकदा दिसून आले. भाजपानेही आता राज ठाकरेंच्याच सुरात सूर मिसळाला आहे.