बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून तिचा खून झाल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केला होता. तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी तिच्या वडीलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर अगदी थोड्यावेळापूर्वी ते मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहचले आहेत. काय केली आहे त्यांनी मागणी? काय आहे मोठी अपडेट?
पोलीस आयुक्तांच्या भेटीला
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन थोड्यावेळापूर्वीच मुंबई पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी कार्यालयात पोहचले. त्यांनी यावेळी माध्यमांना आयुक्तांशी भेट झाल्यावर बोलणार असल्याची माहिती दिली. यावेळी माध्यमांनी त्यांना गराडा घातला होता. त्यांच्यासोबत इतर व्यक्ती सुद्धा होत्या. आज सालियान यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आज सतीश सालियान हे पोलीस आयुक्तांना भेटून त्यांची तक्रार थेट देणार असल्याचे समजते. आतापर्यंत दिशाचा मृत्यू संशयास्पद असून तिची हत्या झाल्याची थेट तक्रार सतीश सालियान यांनी दिली नव्हती. आज ते लेखी तक्रार देणार असल्याची माहिती समोर येत आहे. आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पोलीस अधिकार परमबीर सिंग आणि सचिन वाझेलाही आरोपी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील सुद्धा होते. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या दालनात ते पोहचले आहेत.
काय आहे घटना?
दिशा सालियनचा मृत्यू पाच वर्षांपूर्वी ८ जून २०२० रोजी झाला होता. पण ही आत्महत्या होती की हत्या होती, यावरून वाद सुरू आहे. मध्यल्या काळात एसआयटी मार्फत तपास करण्यात आला. तरीही आरोप सुरूच होते. आता याप्रकरणात दिशा हिच्या वडीलांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन खून केल्याची याचिका हायकोर्टात दाखल केली आहे.