मुंबई : ज्या मनुष्याअंगी भूतदया नाही. त्यास मनुष्य म्हणणे योग्य होणार नाही. मनुष्याच्या अंगी दया असणे हे एक धार्मिकपणाचे लक्षण आहे. मनुष्य आजारी पडला तर त्याची त्या व्याधीपासून मुक्तता होण्यासाठी ठिकठिकाणी दवाखाने, रुग्णालये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे मूक प्राण्यास काही आजार झाल्यास, रोग झाल्यास त्याचे रक्षण व्हावे यासाठी असेच एखादे ठिकाण असावे या हेतूने मुंबईत 1834 साली पशु, पक्षी, मूक जनावरे यासाठी एक स्थान बांधण्यात आले. हेच मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण पांजरापोळ.
दया धरम का मूल है। पापमूल अभिमान ।।
तुलसी दया न छांडिये । जब लग घट मे प्रान ।।
असे संत तुलसीदासने एका ठिकाणी म्हटले आहे. हे बोधवचन लक्षात घेऊन शेठ मोतीचंद अमीचंद याने हे पांजरापोळ बांधले. शेठ मोतीचंद हा प्रसिद्ध असा सधन व्यापारी. त्याने कावसजी पटेल यांच्या तळ्याजवळची एक मोठी जागा विकत घेतली. त्या जागेवर वाडा बांधून त्याला ‘पांजरापोळ’ हे नाव दिले.
पांजरापोळ वाड्यात पक्ष्यांना ठेवण्यासाठी निरनिराळे पिंजरे, जागा केली. गाई, म्हशी, घोडे यासारख्या जनावरांसाठी गोठे बांधले. कुत्रे, माकड, मांजर यासाठी निराळी ठिकाणे निवडून तेथे पिंजरे उभारले गेले. तर, कासव यासारख्या जलचरांसाठी विहिरी बांधल्या. अशा विविध सोयीसुविधा तयार करून या प्राण्यांच्या दाणा पाणी साठी, जागेच्या देखरेखीसाठी, तिच्या स्वच्छतेसाठी नोकर ठेवले.
जे प्राणी, पक्षी रोगी असत, जे अशक्त असता अशांना पांजरापोळमध्ये आणून सोडले जात असे. तेथे त्यांची उत्तम प्रकारे सेवा करण्यात येत असे. या पांजरापोळची व्यवस्था अतिशय उत्तम होती. पांजरापोळचा खर्च चालविण्यासाठी शेठ मोतीचंद यांनी त्याकाळी 30,000 रुपये अमानत रक्कम ठेवली होती. त्या रकमेचे जे व्याज मिळत होते त्यामधून होणारा खर्च भागविला जात होता.
मुंबई तेव्हा व्यापारी लोकांची नगरी म्हणून नावरूपाला येत होती. येथील व्यापारांना प्रचंड नफा होत होता. त्या नफ्यातून रुपयामागे एक आणा धर्मादाय म्हणून काढण्याचा येथील व्यापाऱ्यांचा एक नियम होता. व्यापाऱ्यांकडून जमा होणाऱ्या त्या आण्यांपैकी काही भाग पांजरापोळाकडे देण्यात येत होता तर अन्य भाग हा इतर धर्मकृत्यांसाठी दिला जायचा.
कित्येक धार्मिक लोक अशा कामासाठी वेळोवेळी पैशाच्या देणग्याही देत असत. आलेलया पैशाचा जमाखर्चाचा हिशोब पाहण्यासाठी, पांजरापोळमधील व्यवस्था नीट लावण्यासाठी एक ऑफिसही थाटण्यात आले होते.
पांजरापोळमध्ये असलेले गाई, म्हशी किंवा घोडे कुणाला हवे असल्यास ‘मी त्याचे योग्य असे पालन करेन. ते विकणार नाही’ याची हमी तेथील व्यवस्थापकाला करून द्यावी लागत असे. व्यवस्थापकाची तशी योग्य खात्री पटल्यानंतरच ते जनावर त्या व्यक्तीला देण्यात येई. तसेच जी व्यक्ती जनावर सांभाळू शकत नसल्यास तो ते पांजरापोळमध्ये आणून सोडत असे.
पायधुनी येथे हे जुने पांजरापोळ होते. तर, गिरगाव येथेही नामदार जगन्नाथ शंकरशेट शाळेजवळ सरजेमशेटजी जीजीभाई यांनी गुरांना चरण्यासाठी जागा ठेवली होती. हीच पुढे ‘गायवाडी’ म्हणून प्रख्यात झाली. येथे गुरासाठी चारा, पाण्याची सोय करण्यात आली होती. 1838 पर्यंत शहरवासी लोकांच्या गाई, म्हशी वगैरे जनावरे येथे चरावयास नेत. बाजूलाच धोबी कपडे धुवत आणि मैदानही खुले होते. त्यामुळे गुरांना चारा मिळून पाण्याचीही चांगली सोय होत असे.
गुरांना पाणी मिळावे म्हणून मैदानात काही लोकांनी मिळून मुद्दाम टाकी बांधली होती. मात्र, सरकारने गुरे चारण्याबद्दल दर म्हशीला 3 पैसे, गाईला 2 पैसे आणि शेळीसाठी 1 पैसे असा कर बसविला. पुढे काही दिवसांनी कर मिळत असतानाही सरकारने येथे गुरांना चारण्यास बंदी घातली.
सरकारच्या या निर्णयामुळे गुराखी लोक आपल्या जनावरास घेऊन गिरगावच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळवंटात नेऊन सोडत असत. पण, पुढे मुंबईचे एक्झिक्युटिव इंजिनिअर यांनी आपल्या ऑफिसमधून गवळी वगैरे लोकांना पास देण्यास सुरवात केली. हे पितळेचे पास जनावरांच्या गळ्यांत बांधून गवळी आपल्या जनावरांना मैदानात चारण्यासाठी नेऊ लागले. मात्र, कालौघात मुंबईमध्ये ट्राम, सायकल, गाड्या यांचा पसारा वाढला आणि गुरांची संख्या कमी झाली तसे तसे या पांजरापोळचे महत्वही कमी होऊ लागले. बदलत्या इतिहासात मुंबईच्या पांजरापोळचे नाव आता पांजरपोळ म्हणून घेतले जात आहे. तरीही मुंबईची ती जुनी वास्तू मुंबईच्या शहरीकरणात आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहे.