डोंबिवलीत ‘मिशन मंगल’ सिनेमावेळी थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळला, दोघी जखमी
डोंबिवलीत 'मिशन मंगल' चित्रपटाचा खेळ सुरु असताना मधुबन सिनेमागृहातील बाल्कनीचा भाग कोसळला. यामध्ये एक महिला आणि चिमुरडी जखमी झाल्या आहेत.
डोंबिवली : डोंबिवलीत मधुबन थिएटरच्या बाल्कनीचा (Dombivali Madhuban Theatre Slab Collapse) काही भाग कोसळल्याने महिला आणि चिमुरडी जखमी झाल्या आहेत. अक्षयकुमारच्या ‘मिशन मंगल’ (Mission Mangal) चित्रपटादरम्यान ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेले राम नगर पोलिस दीड तासानंतर घटनास्थळी पोहचल्याचा आरोप केला जात आहे.
डोंबिवलीच्या विष्णुनगर परिसरातील मंगल धाम सोसायटीत राहणारे 11 जण काल (रविवारी) संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मधुबन थिएटरमध्ये “मिशन मंगल” चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट संपण्याच्या पाच मिनिटं आधी थिएटरमधील बाल्कनीचा काही भाग कोसळला.
या घटनेत नंदिनी गंपुले आणि 6 वर्षाची हेमाली झोपे ही चिमुरडी जखमी झाली. दोघींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
धक्कादायक बाब म्हणजे सिनेमागृहापासून काही अंतरावर असलेल्या राम नगर पोलिसांना याची माहिती मिळाली नसल्याचं म्हटलं जात आहे. सुदैवाने मोठा अपघात न घडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र पोलिस आणि महापालिका कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.