पोलिसांनी जाणूनबुजून एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन; असं का म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
Sharmila Thackeray : अक्षय शिंदे याच्या एनकाऊंटरवर राजकारण तापले आहे. या एनकाऊंटरवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. पोलिसांनी जाणूनबुजून एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन, हे वक्तव्य चर्चेत आले आहे.
बदलापूर येथील शाळकरी लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एनकाऊंटर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या एनकाऊंटरवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याला मारून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. तर आता या वादात शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा उडी घेतली आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाही तर महिला म्हणून बोलते आहे, असे स्पष्ट करत त्यांनी बाजू मांडली.
पोलिसांचं डबल अभिनंदन
पोलिसांनी एन्काऊंटर केलं असेल तर पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काऊंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन, असा आलेला एक मेसेज त्यांनी वाचून दाखवला. कसंही एन्काऊंटर असलं तरीही महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत हे देखील लक्षात घ्यायला हवं. जोपर्यंत कायद्याचा धाक होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे एन्काऊंटर झालीच पाहिजेत. पुरुषी बलात्कारी लोकांवर अशाने वचक बसेल. मी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाही आहे. मी महिला म्हणून बोलते आहे. मला स्वतःला एक मुलगी आहे, मी महिलांच्या बाजूने बोलते आहे, आम्हा महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राजकारणी, विरोधक, कोर्ट काय बोलत आहे त्याच्याशी मला पडलेले नाही मी हे महिला म्हणून बोलते आहे. त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण करायची असेल तर अशा प्रकारचे एन्काऊंटर हे झालेच पाहिजेत अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
अक्षय शिंदेविरोधात पुरावे
पुरावे वगैरे मला माहिती नाही मात्र उज्ज्वल निकम स्वतः बोलले की पोलिसांकडे आणि कोर्टाकडे याचे पुरावे आहेत. लहानग्या मुलींनी देखील त्याला ओळखलं आहे. त्याच्याविरुद्ध पुरावे नाहीत असं नाही आहे. कोर्टात जितक्या वेळ केस चालते तितक्या वेळ महिलेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत राहते. दिल्लीच्या क्राईममध्ये सहा वर्षानंतर निर्णय लागतो, आपण शक्ती कायदा नुसता बोलतो, मात्र आम्हाला अशा प्रकारचा शक्ती कायदा पाहिजे. महिलांवर अत्याचार होत आहेत हे लोकशाहीला पूरक आहे का, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी विरोधकांना विचारला.
आम्हा महिलांना जे घडलं तशा प्रकारचा शक्ती कायदा अभिप्रेत आहे. लहान मुली आहेत सहा वर्षानंतर त्यांना कोर्टात उभं केलं तर त्यांच्या लक्षात राहील का? एक-दोन महिन्यात निकाल लावलेत तर अतिउत्तम नाही लावलेत तर हे त्याहून अतिउत्तम. हैदराबादला एका मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी बलात्कारांचे एन्काऊंटर केले होते. त्यावेळी सकाळी-सकाळी जे विरोधक बोंबलतात त्यांच्याच वृत्तपत्रात हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले गेले होते. हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्र पोलिसांना वेगळ्या न्याय असं का? त्यांनी एन्काऊंटर केलं तर त्यांचं कौतुक आणि यांनी केलं तर प्रश्नचिन्ह का?
तो काही संत नव्हता
तो काही संत नव्हता तो बलात्कारी होता, मुलींना ओळखलं आहे पुरावे देखील आहेत. मी पोलिसांना सांगितलं आहे सरकारकडून, पोलिसांकडून त्यांना मदत केली जाईल. मात्र आमची देखील वकिलांची टीम आहे ती देखील तुम्हाला गरज वाटली तर मदत करेल, असे ठाकरे यांनी आश्वासन दिले. मला एक पुरुष दाखवा जो म्हणेल हे छान होतं कुणालाही हे पटणार नाही महिलांवर होणारे अत्याचार कोणालाही पटणारी नाहीत. कायदे अतिशय तकलादू आहेत, इंग्रजांच्या काळातले आहेत त्यावेळी इतके गुन्हे होत नसतील. मी त्यांच्या दुःखात सहभागी होऊ शकते कारण त्यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे. मात्र त्यांच्या मुलांने केलेल्या कृत्यात संदर्भात मी सहभागी होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले.