गायीवर बोलणारे महागाईवर बोलत नाहीत; संघाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंनी दिला दाखला
तुम्ही गायीवर बोलता, पण महागाईवर बोलत नाही, आणि चक्कार शब्द काढत नाही. तसेच महागाईवर बोलल्यानंतर मात्र त्यांचे मंत्री जय श्रीराम म्हणतात असा टोलाही उद्धव ठाकरे भाजपला लगावला.
मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून खरी शिवसेना (Shivsena) कुणाची आणि त्यानंतर दसरा मेळाव्यावरुन खरा दसरा मेळावा कुणाचा या वादाने टोक गाठले होते. मूळ शिवसेनेचा दसरा मेळावा (dussehra rally) नेमका कुठे होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आज दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे शिंदे गटावर निशाणा साधला त्याच प्रमाणे त्यांनी भाजपवर आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी शिंदे गट आणि त्यांच्या सोबत असलेल्या भाजपबद्दल बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना हात घातला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, हिंदूत्व आणि शिंदे गटाच्या गायीवरुन चाललेल्या राजकारणावरह त्यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही गायीवर बोलता, पण महागाईवर बोलत नाही, आणि चक्कार शब्द काढत नाही. तसेच महागाईवर बोलल्यानंतर मात्र त्यांचे मंत्री जय श्रीराम म्हणतात असा टोलाही भाजपला लगावला.
यावेळी राष्ट्रीय संघाचे दत्तात्रय होसबाळे यांनी गरीबी, बेरोजगारी चिंताजनक असल्याचे बोलल्याबद्दल त्यांचेही आभार उद्धव ठाकरे यांनी मानले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, दत्तात्रय होसबाळे तुम्ही महागाईवर बोलून भाजपला आरसा दाखवला. नरेंद्र मोदी यांच्यावर बोलल्याबद्दल होसबाळे यांनी त्यांच्याच पक्षाला त्यांनी आरसा दाखवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुले नितेश आणि निलेश राणे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, कोंबडी चोर आणि बाप चोरांवर म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यांच्यावर या मंचावर बोलायचं नाही.
कारण या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे, अर्थ आणि विचारही आहे. त्यामुळे ऐकण्यासाठी तुम्ही आला आहात. ते विचार पुढे नेण्याची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे असंही उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले.