Praful Patel : विरोधी पक्षातल्या आणखी एका नेत्यावर ईडीची कारवाई, प्रफुल पटेलांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसवर टाच!
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर टाच आणण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर टाच आणण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीप्रकरणी (Iqbal Mirchi) ही कारवाई करण्यात आली आहे. काही संपत्तीवर आधीच टाच आणली होती. आता पुन्हा एकदा ईडीने पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. सीजे हाऊस ही बिल्डिंग वरळीत, अॅट्रिया मॉलच्या समोरच्या परिसरात आहे. याच ठिकाणी ईडीने (ED) कारवाई केली आहे. सीजे हाऊस येथील दुसऱ्या मजल्यावर ईडीने आधीच कारवाई केली होती. तर आज चौथ्या मजल्यावर कारवाई केली आहे. दुसऱ्या मजल्यावर ईडीने कार्यालयदेखील सुरू केले आहे. दरम्यान, प्रफुल पटेल सध्या मुंबईतच आहेत. काही वेळापूर्वी ते वाय. बी. सेंटर याठिकाणी होते. ते याठिकाणी येतात का, ते पाहावे लागणार आहे.
प्रकरण काय?
वरळी येथे सीजे हाऊस ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांना काही जागा आणि रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे पैशांची अफरातफर झाल्याचे कारण पुढे करून मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री
राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर आधीच कारवाई करण्यात आलेली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आता प्रफुल पटेल ईडीच्या रडारवर आहेत. वरळीतील सीजे हाऊस या इमारतीत पटेल यांची भागीदारी आहे. इक्बाल मिर्ची आधीच अटकेत आहे. 2019मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीआधी काही नेत्यांना ईडीने नोटीस बजावली होती. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा देखील समावेश होता. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचेही नाव समोर आले होते.