BREAKING | सचिन वाझे याला सर्वात मोठा झटका, ईडीचं महत्त्वाचं पाऊल
सचिन वाझे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली परवानगी मागे घेतली आहे. त्यामुळे आता सचिन वाझेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : निलंबित एपीआय सचिन वाझे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली परवानगी मागे घेतली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार म्हणून परवानगी देण्यात आली होती. पण ईडीने ही परवानगी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन वाझे हा सीबीआयच्या गुन्ह्यातही माफीचा साक्षीदार बनलाय. पण ईडीच्या गुन्ह्यात तो माफिचा साक्षीदार राहणार नाही. ईडीकडून आता त्याबाबत मान्यता नाहीय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंह यांनी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सचिन वाझेने परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपांची री ओढत भ्रष्टाचार होत असल्याचं आपल्या जबाबात म्हटलं होतं. तसेच सेवेत परत घेण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप सचिन वाझेने केला होता. याच प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदाराची परवानगी देण्यात आली होती. सचिन वाझेने आपण कोर्टात सर्व खरं सांगू या अटीवर त्याला माफीच्या साक्षीदाराची परवानगी देण्यात आली होती.
सचिन वाझे याच्याविरोधात अनेक गुन्हे
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील मोठमोठे बार, रेस्टॉरंट आणि पब मालकांकडून 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप सिंह यांनी पत्रात केला होता. तसेच सचिन वाझे हा खंडणीच्या वसूलीचं काम करायचा. तसेच पोलिसांच्या बदल्यांमध्येही घोटाळा केला जायचा, असे गंभीर आरोप देशमुखांवर करण्यात आले होते.
या प्रकरणी अनिल देशमुख यांना तब्बल 11 महिने जेलमध्ये राहावं लागलं. दरम्यानच्या काळात सीबीआयनेदेखील कोर्टात सचिन वाझेच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला होता. वाझेच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये ठाण्याचे हिरे व्यापारी मन्सूख हिरेन प्रकरण देखील आहे. या प्रकरणाचा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याशी संबंध असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांचा तपास सुरु आहे. दरम्यान, सचिन वाझे याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.