… म्हणून दहावीच्या निकालाचा टक्का घसरला : शिक्षणमंत्री
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 12.31 टक्क्यांनी कमी लागला आहे. त्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही प्रतिक्रिया देत निकाल कमी लागण्यामागील कारणे सांगितली.
मुंबई : यावर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल 77.10 टक्के एवढा लागला. मागील वर्षी हाच निकाल 89.41 टक्के लागला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 12.31 टक्क्यांनी कमी आहे. त्यानंतर यावर पालकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही यावर प्रतिक्रिया देत निकाल कमी लागण्यामागील कारणे सांगितली.
शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, “निकाल कमी लागल्याने स्वाभाविकपणे काही पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, काही शिक्षण तज्ज्ञांनी या निकालासंदर्भात माझ्याकडे समाधान व्यक्त केले आहे. 2007 पर्यंत 20 अंतर्गत गुण देण्याची पद्धत नव्हती. 2008 पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 गुण देण्याची पद्धत सुरु झाली. ही पद्धत 2018 पर्यंत सुरु होती. गेल्या वर्षापासून आपण ती थांबवली. परंतु 2007 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची पद्धत नव्हती. त्यावेळी शालांत परीक्षेचा निकाल 78 टक्के लागला होता. त्यानंतर ही पद्धत जेव्हा 2008 मध्ये सुरु झाली, त्यावेळी शालांत परीक्षेचा निकाल 87.41 टक्के लागला. या निकालात 2007 च्या तुलनेत सुमारे 9 टक्के एकदम वाढ झाली.”
कमी निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची कमी झालेली सूज
यावर्षीच्या कमी निकालाचे समर्थन करताना तावडे म्हणाले, “यावर्षी मागीलवर्षीच्या तुलनेत जो 12.31 टक्के निकाल कमी झाला, तो कमी निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमी झाली. विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे. जेणेकरुन त्या विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर योग्य दिशा दहावीलाच मिळू शकेल. केवळ दहावीला जास्त मार्क मिळाले आणि पास झाल्यानंतर 11 वी प्रवेश घ्यायचा. पदवीधर व्हायचे आणि बेरोजगारांच्या कारखान्यात दाखल व्हायचे. यापेक्षा दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना त्याची गुणवत्ता कळली, तर तो विद्यार्थी त्या पध्दतीचे करिअर निवडू शकतो. त्यातून त्या विद्यार्थ्याला चांगली संधी मिळू शकेल.”
निकालामधून विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची दिशा कळली
या निकालामूळे विद्यार्थ्यांनी निराश होण्याचे कारण नाही. दहावीच्या निकालामधून विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची दिशा कळली असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन तावडे यांनी आपल्या निवेदनात विद्यार्थ्यांना केले. ते पुढे म्हणाले, “मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. या फेर परीक्षेसाठी महिन्याभरात चांगला अभ्यास केला, तर स्वाभाविकपणे फेरपरीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेता येईल, अन्यथा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रमाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या आधारे विद्यार्थी शिक्षित झाला तर तो विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.”