मुंबईकरांचा लाँग विकेंड बोंबलला, सोमवारीची ईदची सुट्टी रद्द, आता ‘या’ तारखेला मिळणार सुट्टी
जर तुम्हीही लाँग विकेंडचा प्लॅन करुन फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर मात्र तुमच्या आनंदावर विरजण पडणार आहे. कारण राज्य सरकारकडून ईदीच्या सुट्टी बदल करण्यात आला आहे.
Eid a milad 2024 Holiday Change : सध्या मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव म्हटलं की अनेक जण रात्री उशिरा जागरण करुन गणपती, त्याची सजावाट, आरास पाहण्यासाठी जात असतात. या काळात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. तर नोकरदार वर्ग हा विकेंड किंवा सार्वजनिक सुट्ट्यांची वाट बघत असतो. यंदा गणेशोत्सवात आलेल्या लाँग विकेंडला सुरुवात झाली आहे. मात्र जर तुम्हीही लाँग विकेंडचा प्लॅन करुन फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर मात्र तुमच्या आनंदावर विरजण पडणार आहे. कारण राज्य सरकारकडून ईदीच्या सुट्टी बदल करण्यात आला आहे.
यंदा गणेशोत्सवात सलग चार दिवस सुट्टी आली होती. विशेष म्हणजे ही सुट्टी विकेंडला असल्याने अनेकांनी मस्त फिरण्याचा, गणपती पाहण्याचा प्लॅन केला होता. आज 14 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. त्यानंतर 15 सप्टेंबरला रविवार असल्याने सुट्टी असणार आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरला ईद अ मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे. त्यामुळे तेव्हाही शासकीय सुट्टी असणार आहे. यानंतर मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याने सुट्टी असणार आहे. यामुळे सलग चार दिवस सुट्टी आल्याने अनेकांनी छान विकेंड एन्जॉय करण्याचे प्लॅनिंग केले आहे.
राज्य सरकारकडून ईदची सुट्टी बदलण्याचा निर्णय
मात्र आता हे प्लॅनिंग विस्कटणार आहे. कारण विकेंडला लागून येणारी ईदची सुट्टी बदलण्याचा निर्णय सरकाराने घेतला आहे. 16 सप्टेंबर रोजी ईद अ मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण साजरा होणार आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी ‘ईद मिलाद उन -नबी’ निमित्त अनेक मुस्लिम बांधव हे राज्यात जुलूस काढून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात. यानिमित्ताने राज्य सरकारकडून १६ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
मात्र 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राखावा यासाठी मुंबई शहर आणि उपनगर, तसेच काही जिल्ह्यात मुस्लिम धर्मियांनी 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला ईदची सुट्टी असणार आहे.
18 सप्टेंबर रोजी असणार सुट्टी
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.16 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात आली होती. मात्र आता या सुट्टीत बदल करण्यात येत आहेत. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यात काही गणेश विसर्जनाच्या राज्यात मिरवणुका असणार आहेत. तसेच राज्यात सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांनी पैगंबर हजरत मोहम्मद जन्मदिन उत्सवाचे जुलूस बुधवारी 18 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी शासनाने सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली होती.
या मागणीनंतर राज्य शासनाकडून 16 सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. ही सुट्टी 18 सप्टेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर या भागात देण्यात येणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने , जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे अनेक मुंबईकरसह राज्यातील जनतेचा मोठा खोळंबा होणार आहे.